आज बँकिंग अग्रणी स्टेट बँकेचा तिमाही निकाल
वाढत्या बुडीत कर्जाच्या समस्या अधिकाधिक तीव्र बनत आहे, तर नव्याने कर्ज मागणीतही वाढ नाही अशा कात्रीत सापडलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्याला गंभीर स्वरूपाची झळ बसली असल्याचे त्यांचे ताजे तिमाही निकाल स्पष्टपणे दर्शवितात.
मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ तिमाहीत अवघा ५१ कोटी रुपयांचा नफा कमावला. आधीच्या वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत तो तब्बल ९३.४ टक्क्यांनी गडगडला आहे. जुलै-सप्टेंबर २०१५ तिमाहीत बँकेने ६२१.०३ कोटी रुपये असा होता. या बँकेने डिसेंबर तिमाहीअखेर ढोबळ बुडीत कर्जाचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण ११ वर्षांतील सर्वाधिक ८.४७ टक्के नोंदविले आहे. गतवर्षांअखेर २२,२११ कोटी रुपयांवरून बुडीत कर्जे यंदाच्या डिसेंबरअखेर ३४,३३८ कोटी रुपयांवर गेली आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँकेनेही मंगळवारी अलीकडच्या काळातील सर्वात वाईट तिमाही कामगिरींची नोंद केली. सेंट्रल बँकेने डिसेंबर तिमाहीत ८३६.६२ कोटी रुपयांचा तोटा दाखविला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला १३७.६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या बँकेचे ढोबळ बुडीत कर्जे एकूण वितरित कर्जाच्या ८.९५ टक्क्यांवर गेले आहे.
देना बँकेबाबत तर ते १० टक्क्यांच्या वेशीवर म्हणजे ९.८५ टक्के असे झाले आहे. परिणामी देना बँकेने डिसेंबर तिमाहीत ६६२.८५ कोटी रुपयांचा तोटा केला आहे. अलाहाबाद बँकेच्या डिसेंबर तिमाहीतील तोटय़ाचे प्रमाण ४८६.१४ कोटी रुपये असे तर ढोबळ बुडीत कर्जाचे प्रमाण ६.४० टक्के असे आहे. आगामी दोन दिवसांत बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बडय़ा बँकांची तिमाही कामगिरी जाहीर होत असून, विश्लेषकांच्या मते बुडीत कर्जाच्या आघाडीवर या बँकांची स्थिती फारशी वेगळी नसेल. उल्लेखनीय म्हणजे बुडीत कर्जाच्या समस्येतून खासगी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्याला बसलेली कात्री अधिक गंभीर स्वरूपाची आहे.
तुलनेने छोटय़ा असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने डिसेंबर तिमाहीत ५५ टक्क्यांहून अधिक निव्वळ नफ्यातील वाढ नोंदविली.

बाजारमूल्याचे १,३७,००० कोटी नुकसान
केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कारभार सुधारासाठी ‘इंद्रधनुष’ नावाची सात कलमी योजनेची अंमलबजावणी सुरू केली त्या सहा महिन्यांच्या काळातच या बँकांच्या वित्तीय कामगिरीला गंभीर स्वरूपाची ओहोटी लागत असल्याचे दिसत आहे. खराब पतगुणवत्ता आणि घसरलेल्या नफ्यातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभाग मूल्यालाही घरघर लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत भांडवली बाजारात सूचिबद्ध २२ सार्वजनिक बँकांच्या बाजारमूल्याला १,३७,००० कोटी रुपयांनी ओहोटी लागली आहे. सर्वच प्रमुख बँकांचे बाजार मूल्य आणि समभाग मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे. बाजारात बँकिंग समभागांवर विक्रीचा निरंतर दबावापायी अनेकांचे समभाग मूल्य बहुवार्षकि नीचांकवर गेले आहे.
मंगळवारच्या तिमाही निकालात तोटा दर्शविणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक व देना बँक तर नफ्यात लक्षणीय घट दाखविणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या समभागांनी सलग दुसऱ्या दिवशी मोठी मूल्य हानीचा गुंतवणूकदारांना प्रत्यय दिला. आज वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या स्टेट बँकेचा समभाग सेन्सेक्सच्या घसरणीत सर्वात वर राहिला. बुधवारी बँक निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला.

Untitled-19

‘सीआयआय’ उपाययोजना सुचविणार
देशातील विशेषत: सार्वजनिक बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाच्या समस्या निवारणाकरिता उद्योजकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘भारतीय औद्योगिक महासंघ’ (सीआयआय) रिझव्‍‌र्ह बँकेला सूचना करणार आहे. याबाबतच्या शिफारसी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना केल्या जाणार आहेत. संघटनेची बँक विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई होणार असून त्यात बँकांची बुडीत कर्जे तसेच बँकेच्या पुनर्भांडवलावर चर्चा होणार आहे. यासाठीच्या नव्या नियमांची गरजही मांडली जाणार आहे.