राज्यातील सहकारी बँकांमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँके ने दर्शवली आहे. यामध्ये राज्य बँके च्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांशिवाय ३१ जिल्हा बँकांमध्ये २०,०२४ आणि नागरी बँकांत एक लाख ९० हजार कर्मचारी आहेत. पुण्यातील ९८००, तर मुंबईस्थित ६० बँकांमध्ये २०,३०८ कर्मचारी आहेत. याशिवाय इतर जिल्ह््यांमधील कर्मचारी मिळून अडीच लाखांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण शक्य होणार आहे.

येत्या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे. राज्य सरकार ज्या वयोगटाकरिता मोफत लसीचे धोरण निश्चित करेल, त्याव्यतिरिक्त १८ वर्षांवरील सहकारी बँकिं ग क्षेत्रातील सर्व सेवकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य बँक घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

याबाबत बोलताना राज्य बँके च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, प्रत्येक जिल्ह््यातील शासन यंत्रणेची मदत घेण्यासह मोठ्या रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करून प्रत्येक सेवकाला ‘विशेषाधिकार वैद्यकीय सेवा ओळखपत्र’ देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह््याकरिता जहांगीर रुग्णालयासोबत बोलणी सुरू असून जहांगीर रुग्णालयाने प्रत्येक बँकेच्या ठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिकेसह दोन डॉक्टर व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांसह दररोज ३०० सेवकांचे लसीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सेवेसह सर्व सेवकांना वैद्यकीय सेवा ओळखपत्राच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय सेवांवर दहा ते २० टक्के  सवलतीची योजना सादर के ली आहे. ओळखपत्रासाठी नोंदणी करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

कामकाज वेळेत कपातीचे बँकांना आवाहन

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कर्मचाऱ्यांना आळीपाळीने बोलावून त्यांची उपस्थिती नियंत्रित करणे अत्यावश्यक ठरले आहे. म्हणूनच ग्राहक सेवेच्या वेळा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत असे फक्त चार तासच निश्चित कराव्यात, असे आवाहन ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सर्व नागरी सहकारी बँकांना उद्देशून केले. भारतीय बँक महासंघ (आयबीए)ने याच प्रकारचे आवाहन सदस्य बँकांना उद्देशून केले असून, व्यापारी बँकांमध्ये १० ते २ वेळेची अंमलबजावणी सुरूही झाली आहे.