News Flash

स्टेट बँकेचे ‘कुठूनही काम करा’ धोरण; वर्षांला १००० कोटींची बचत अपेक्षित

पुढील सहा महिन्यांत योनोचे वापरकर्ते दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

स्टेट बँकेचे ‘कुठूनही काम करा’ धोरण; वर्षांला १००० कोटींची बचत अपेक्षित
संग्रहित छायाचित्र

देशातील अग्रेसर बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने करोना कहराच्या पार्श्वभूमीवर, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘कुठूनही काम करा’ धाटणीची लवचीक कार्यप्रणाली विकसित केली असून, त्यायोगे वर्षांला १,००० कोटी रुपयांची खर्चात बचत साधली जाणे अपेक्षित आहे.

स्टेट बँकेच्या मंगळवारी झालेल्या ६५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, भागधारकांना दृक्श्राव्य माध्यमांद्वारे संवाद साधताना अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आगामी वाटचालीविषयी भाष्य केले. खर्चात काटकसर, मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण, कर्मचाऱ्यांचे कौशल्य पुनर्विकास, उत्पादकतेत सुधारणा आणि प्रशासकीय कार्यालय ते विक्रीत कार्यरत कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन अशा कार्यसूत्रांद्वारे वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात सर्वत्र व्यवहारात आणली जात असलेली ‘कुठूनही काम करण्याची’ कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना, कर्मचाऱ्यांनी काम आणि व्यक्तिगत जीवनात संतुलनाचा सामाजिक पैलू सांभाळावा, असे आवाहन कुमार यांनी केले. या उपायांसह प्रत्येक खर्चल्या गेलेल्या रुपयाचा प्रभावी वापर होऊन, जवळपास १,००० कोटी रुपयांची बचत शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तब्बल ४४ कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग वाहिनी असलेल्या ‘एसबीआय योनो’ आणि मोबाइल अ‍ॅपने मागील तीन महिन्यांत लक्षणीय प्रगती साधली आहे, असे कुमार यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांत योनोचे वापरकर्ते दुप्पट करण्याचे उद्दिष्ट राखले असल्याचे ते म्हणाले.

कर्जवसुली कामगिरीत सातत्य

करोनाचा विषाणूजन्य आजाराच्या साथीने ग्रस्त सध्याचा काळ खूपच असामान्य असला तरी, आर्थिक वर्ष २०१९-२० मधील कर्जवसुली कामगिरीत चालू वर्षांतही सातत्य राखले जाईल, असा विश्वास रजनीश कुमार यांनी व्यक्त केला. सरलेल्या वर्षांत थकीत कर्जापैकी २५,७८१ कोटी रुपयांची वसुली बँकेने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:15 am

Web Title: state banks work from anywhere policy abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गटांगळी!
2 ‘महाजॉब्स’वर आठवडाभरात १,६६७ कंपन्यांची नोंदणी
3 विमा कंपन्यांना कोविड-१९ विमाछत्राचे भरते!
Just Now!
X