भारतभरातून लाखोच्या संख्येने स्थलांतरित झालेले निष्णात आभूषण कारागीर आणि जवाहिरांचे मुंबई आणि महाराष्ट्र हेच मुख्य केंद्र बनले आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्तरावर टाळेबंदी आणि पर्यायाने व्यापारबंदीचे आलेले निर्बंध हे संपूर्ण देशातील व्यापारावर आणि सोन्याच्या दागिन्यांच्या पुरवठा शृंखलेवर परिणाम करणारे ठरतील, अशी भीती अखिल भारतीय रत्न व आभूषण परिषद (जीजेसी)ने व्यक्त केली आहे.

सोने खरेदीच्या पारंपरिक महत्त्वाच्या खरेदी मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा पुढील आठवड्यात येत आहे. या दिवशी सराफ व्यावसायिकांकडून विक्रीत किमान ३० ते ४० टक्क््यांची वाढ साधली जाते. शिवाय एप्रिलच्या मध्यापासून जूनपर्यंत लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे यानिमित्ताने तरी राज्यात सराफांना विक्री दालने आवश्यक ती खबरदारीच्या सूचनांसह खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनवणी जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे.

हिरे व्यापाराची सर्वात मोठी बाजारपेठ आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करणारा घाऊक केंद्र असलेला जव्हेरी बाजार मुंबईतच मोडतो. त्यामुळे येथील व्यवसायावर आलेले निर्बंध हे सोन्याच्या संपूर्ण भारतातील व्यवसायाला बाधित करणारे ठरतात, असे पेठे यांनी या पत्राद्वारे सूचित केले आहे.

लग्नसराईत वधू-वरांनी दागदागिने करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळे अशा काळात सोने खरेदी हीदेखील अत्यावश्यकच ठरते आणि याचा सरकारने विचार करावा, असेही पेठे यांनी पत्रातून सूचित केले आहे.