News Flash

‘उद्योजक म्हणून मी अपयशीच’

‘सीसीडी’चे प्रवर्तक सिद्धार्थ यांचे पत्राद्वारे कथन

(संग्रहित छायाचित्र)

‘उद्योजक म्हणून मी अपयशी ठरलो आहे,’ अशा शब्दांत आपल्या भावना सोमवारपासून बेपत्ता असलेले कॉफी डे एंटरप्राइजेसचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी कंपनीच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या पत्रात प्राप्तिकर विभागाच्या छळणुकीकडेही सुस्पष्ट निर्देश केला आहे, तथापि या पत्रावरील नमूद स्वाक्षरी ही सिद्धार्थ यांची नसल्याने हे पत्रच बनावट असल्याचा कर प्रशासनाचा दावा आहे.

व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या सहीसह प्रसिद्ध झालेल्या पत्राची भाषा ही निरोप घेणारीच असली तरी ते त्यांच्याद्वारे लिखित असल्याचा पुष्ठी मात्र होऊ शकलेली नाही. सिद्धार्थ यांच्याशी सोमवार सायंकाळपासून संपर्क होऊ शकलेला नाही आणि पोलिसांकडून शोधमोहिम सुरू झाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे वरिष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांचे ते जावई असल्याने, शासन स्तरावरून शोधमोहिमेच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.

पत्रात ते म्हणतात, ‘तब्बल ३७ वर्षे कठोर परिश्रमाची कास धरून माझी ही कंपनी व तिच्या उपकंपन्यांनी ३०,००० नोकऱ्या निर्माण केल्या आणि माझा मोठा भागभांडवली हिस्सा असलेल्या तंत्रज्ञान कंपनीद्वारे आणखी २०,००० रोजगार निर्माण केला गेला. सर्वोत्तम प्रयत्न करूनही सुयोग्य नफाक्षम व्यवसायाची घडणी करण्यास तरी मी अपयशीच ठरलो आहे.’’

समाज माध्यमांवर मोठय़ा प्रमाणात प्रसारित या पत्रामध्ये त्यांनी, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाची अशा तऱ्हेने निराशा केल्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. प्रदीर्घ काळ संघर्ष केल्याचे नमूद करून सिद्धार्थ म्हणतात, ‘‘मी अंतिमत: हात टेकले असून, एका खासगी गुंतवणूकदारांकडून त्याच्यापाशी असलेल्या समभागांची पुनर्खरेदी करण्याबाबत सुरू असलेला तगादा आणखी सहन करणे अशक्य बनले आहे. हा पुनर्खरेदी व्यवहार सहा महिन्यांपूर्वी एका मित्राकडून मोठी रक्कम उसनवारी घेऊनही आंशिक रूपात पूर्णही केला होता.’’

आणखी एका देणेकऱ्याकडून तीव्र स्वरूपाचा सुरू असलेल्या दबावाने आपण परिस्थितीला बळी पडलो असल्याचे सिद्धार्थ यांनी कोणत्याही नामोल्लेखाविना नमूद केले आहे. मात्र पूर्वीच्या प्राप्तिकर महासंचालकांविरोधात त्यांनी थेट दोषारोप करणारे विधान केले आहे. ‘पूर्वीच्या प्राप्तिकर महासंचालकांनी दोन प्रकरणांमध्ये माझ्या समभागांवर जप्ती आणून, माइंडट्रीच्या व्यवहारात अडचणी आणि कॉफी डेच्या समभागांमध्ये नव्याने व्यवहारासाठी प्रतिबंध केला,’’ असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सुधारीत विवरण पत्र आमच्याकडून दाखल केले गेल्यानंतरही हा आडमुठेपणा केला गेल्याचा त्यांचा आरोप आहे.

आपला हेतू कधीही कोणाची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा नव्हता, असा दावा करीत सिद्धार्थ म्हणतात, ‘‘माझे हे प्राजंळ कथन आहे की, मी उद्योजक म्हणून अपयशी ठरलो आहे. एके दिवशी तुम्ही सर्व माझी भावना समजून घ्याल आणि मला क्षमा कराल अशी आशा आहे.’’ सिद्धार्थ यांनी असेही स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या मालमत्तांचे पारडे या एकूण दायीत्वाच्या तुलनेत जड आहे आणि सर्व देणी फेडण्यास त्यातून मदत होऊ शकेल.

कॉफी बागायतदाराचा पुत्र ते सर्वात मोठय़ा कॉफीपान शृंखलेचा संस्थापक

नवी दिल्ली : एका कॉफी बागाइतदाराचा मुलगा ते स्टारबक्ससारख्या नाममुद्रेला तोडीस तोड ‘कॅफे कॉफी डे – सीसीडी’ नावाची देशातील सर्वात मोठी कॉफीपान गृहांच्या शृंखलेचा संस्थापक असा व्ही. जी. सिद्धार्थ प्रगतीचा पट राहिला आहे.

त्यांच्या कुटुंबाचा कैक पिढय़ांचा म्हणजे १४० वर्षांचा कॉफीच्या बागांच्या मालकीचा व्यवसाय राहिला आहे. वयाची साठी गाठलेल्या सिद्धार्थ यांनी पिढीजात व्यवसायाला ‘सीसीडी’सारखे आधुनिक रूप देण्याआधी अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये आपला पाय जमविण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवात त्यांनी समभाग व्यवहारासाठी दलाली पेढीच्या व्यवसायाने केली.

मंगळूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या सिद्धार्थ यांनी सिवान सिक्युरिटीज नावाने बंगळूरू येथे कंपनीची मुहूर्तमेढही रोवली. नंतर याच कंपनीचे ‘वे २ वेल्थ’ असे नामकरण केले गेले. मुंबईत गुंतवणूकदार बँकर म्हणून नोकरीत असताना, भारतीय सैन्य दलात दाखल होण्याकडेही त्यांचा कल होता. १९९३ साली ‘एबीसी’ या नावाने त्यांनी कॉफीचा व्यापार करणारी कंपनी सुरू केली. पहिल्या वर्षी या कंपनीची ६ कोटींच्या घरात असलेली उलाढाल अल्पावधीतच २,५०० कोटींवर पोहोचली. कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्य़ात त्यांनी कॉफी बागाही संपादित केल्या आणि १९९४ साली कॅफे कॉफी डेच्या बंगळूरू येथील ब्रिगेड रोड येथील पहिल्या दालनापासून त्यांनी एका प्रथितयश व्यवसायाची पायाभरणी केली. आज देशभरात २०० शहरांमध्ये सीसीडीची १,७५० दालने असून, प्राग, व्हिएन्ना, क्वालालम्पूर अशी विदेशातही तिने पंख पसरले आहेत. २०१५ या कंपनीने अत्यंत यशस्वी प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे भांडवली बाजारातही पदार्पण केले. १९९९ मध्ये माहिती-तंत्रज्ञानातील अनेक ज्येष्ठ-अनुभवी मंडळींच्या साथीने सिद्धार्थ यांनी ‘माइंडट्री’ नावाची कंपनी स्थापित केली. या कंपनीत ते सर्वात मोठे भागधारक होते. अलिकडे मार्चमध्ये त्यांनी माइंडट्रीमधील सर्व २०.४१ टक्के हिस्सा लार्सन अँड टुब्रोला विकून तब्बल २,८५८ कोटी रुपयांचा नफा या व्यवहारातून कमावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:48 am

Web Title: statement by letter from ccd promoter siddhartha abn 97
Next Stories
1 भारत २०२५ पर्यंत पर्यावरणपूरक इमारतींचे मुख्य केंद्र बनेल
2 आरोग्य विम्यातून कर वजावटही शक्य!
3 ‘एमटीएनएल’चे ‘बीएसएनएल’मध्ये विलीनीकरण
Just Now!
X