शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना उत्तम बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी ‘ई-नाम’ या तंत्रस्नेही व्यवहार पद्धतीचा अंगीकार करावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी, विविध राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची तळी उचलण्याऐवजी ‘ई-नाम’ पद्धती स्वीकारावी, असे आवाहनही केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडईंना तंत्रस्नेही संपर्क जाळे ‘इ-नाम’द्वारे उपलब्ध आहे. या माध्यमातून कृषी वस्तूंचे व्यवहार होतात. महाराष्ट्रासह २१ तंत्रस्नेही मंडई आठ राज्यांमध्ये आहेत.

केवळ बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य दर मिळणे शक्य होत नाही, असे सीतारामन म्हणाल्या. या यंत्रणेऐवजी ‘इ-नाम’कडे अधिक गतीने राज्यांनी वळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.