03 December 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : सावध पावले

टाटा स्टीलने डिसेंबरअखेर तिमाही निकालांत निराशाजनक कामगिरी जाहीर केली.

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मागील आठवडय़ात अर्थसंकल्पातील जमेच्या बाजू विचारात घेतल्यावर बाजारात आलेल्या सर्वसमावेशक तेजीनंतर या आठवडय़ात बाजाराचे लक्ष प्रामुख्याने जागतिक बाजारांकडे आणि विविध कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे होते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोणत्या उद्योगांवर काय परिणाम होईल याकडे देखील बाजार लक्ष ठेवून होता. त्या विषयी येणाऱ्या उलट-सुलट बातम्यांमुळे बाजार, निर्देशांकांच्या ठरावीक पट्टय़ामध्ये मार्गक्रमण करीत राहिला. परिणामी सेन्सेक्समध्ये केवळ ११६ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात १५ अंशांची साप्ताहिक वाढ झाली.

टाटा स्टीलने डिसेंबरअखेर तिमाही निकालांत निराशाजनक कामगिरी जाहीर केली. कंपनीने १,२०० कोटींचा तोटा जाहीर केला व त्यामुळे कंपनीचे समभाग या आठवडय़ात नऊ टक्क्य़ांनी घसरले. लोह उत्पादनांच्या किमतीतील वाढीचा परिणाम पुढील तिमाहीत दिसेल. करोनामुळे जागतिक बाजारात घसरणाऱ्या किमतीचा परिणाम अल्पकाळ राहील त्यामुळे समभागांच्या किमती आणखी खाली गेल्याच तर ती गुंतवणुकीची संधी असेल.

‘सियाम’ने जाहीर केलेले जानेवारी महिन्याचे वाहन विक्रीचे आकडे अपेक्षेप्रमाणे निराशाजनक आहेत. दुचाकींची विक्री १६ तर चारचाकी वाहनांची विक्री आठ टक्क्य़ांनी कमी झाली. भारत स्टेज-६ प्रमाणित वाहनांच्या किमती जास्त असल्यामुळे आणि मंदीतून मार्गक्रमण करणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे वाहन विक्रीला म्हणावा तेवढा जोर नाही. वाहन उद्योगांच्या सुटय़ा भागांच्या पुरवठय़ावर चीनमधील संकटाच्या परिणामाची शक्यता आहे. यातील गुंतवणूक सबुरीनेच करावी लागेल.

सध्या जागतिक बाजारात चीनकडून घटलेल्या मागणीमुळे नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा फायदा करून घेण्याचा पेट्रोनेट एलएनजीचा प्रयत्न आहे. कोची-मंगलोर वायुवाहिनीही लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल. इंद्रप्रस्थ गॅसचेही तिमाही निकाल आकर्षक आहेत. नफ्यात ४३ टक्के वाढ झाली. कंपनी दिल्ली परिसरात ५२० विक्री केंद्रे आहेत, तर आता दिल्लीसहित अन्य राज्यांत कार्यक्षेत्र विस्तारत आहे. भारतामध्ये वायुरूपी इंधनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात.

गेल्या तीन वर्षांत आठपट वाढ दिलेला आणि गेल्या महिनाभरात २४ टक्के वर जाणारा समभाग म्हणजे अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट (डी-मार्ट). सामान्य माणसांच्या सुपर स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करण्याच्या आकांक्षा किफायतशीर किमतीमधे पूर्ण करणारी ही कंपनी सामान्य गुंतवणूकदारांना कायमच आवाक्याबाहेर वाटली आहे. अशांना येत्या सोमवारी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टच्या भांडवल विक्रीमधे सहभागी होण्याची संधी येत आहे.

महागाई निर्देशांकातील जानेवारीतील वाढ, औद्योगिक उत्पादन वाढीचे डिसेंबरचे घसरलेले आकडे याकडे बाजाराने दुर्लक्ष केले. विपुल रोकडसुलभता व प्रथितयश कंपन्यांचे नफ्याचे आकडे यावर बाजार सध्या स्वार झाला आहे. अर्थसंकल्पातील धोरणे, उत्तम रब्बी पिकांची आशा व ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधाराची शक्यता यामुळे बाजार तेजी राखून आहे. करोनाच्या उद्रेकाबद्दल कुणी जरी आडाखे बांधू शकत नसले तरी वस्तूंच्या पुरवठा साखळीत व्यत्यय येऊ लागला आहे. ही अनिश्चितता बाजाराला दोलायमान ठेवत आहे. म्हणून सध्या नवीन खरेदीसाठी सावध धोरणच ठेवायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:07 am

Web Title: stock market analysis indian stock market analysis zws 70
Next Stories
1 देशाच्या निर्यातीला ‘करोना’चा संसर्ग
2 सरकारी बँकांत १.१७ लाख कोटींचे घोटाळे
3 स्थिर दृष्टिकोनासह ‘बीबीबी-’ पतमानांकन कायम
Just Now!
X