सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या आठवडय़ात बाजार बंद झाल्यावर आलेल्या रिलायन्स, एचडीएफसी बँक व टीसीएस या तीनही आघाडीच्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजाराने सोमवारी लावलेला नाराजीचा सूर आठवडाभर राहिला. निर्देशांकातील प्रभाव असणाऱ्या या तीन कंपन्यांच्या समभागांनी गेल्या वर्षांत मोठी झेप घेतली होती. कंपन्यांच्या विक्रीमधील निराशाजनक कामगिरीमुळे समभागांची उच्च स्तरावर विक्री करून गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. शेवटच्या दोन दिवसात बाजार सावरला तरी साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ३३२ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात १०४ अंशांची घट झाली.

एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी या सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने तिमाही नफ्यात ४५ टक्के वाढ जाहीर केली आहे. सप्टेंबरअखेर तिमाहीत कंपनीची नफ्यातील वाढ ४२.१५ टक्के होती. वितरकांना देय असणारा दलालीचा खर्च कमी करून खर्चावर नियंत्रण ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. तसेच अधिपत्याखाली असणाऱ्या एकूण मालमत्तेमधील इक्विटी फंडांचे प्रमाण ४६ टक्क्य़ांच्याही वर असल्यामुळे नफ्यात वाढ कायम राखली आहे. एचडीएफसी बँकेचे हे धाकटे भावंड आपल्या मोठय़ांच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करीत आहे व त्याचे बाजारमूल्यही तसेच आहे. या समभागाचा योग्य वेळी गुंतवणुकीसाठी विचार केला जावा. पोर्टफोलियोमधे कायम ठेवण्यासारखी ही कंपनी आहे.

सप्टेंबरअखेर तिमाहीतील तोटय़ाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्सिस बँक डिसेंबर तिमाहीत नफ्यात आली आहे. एचडीएफसी बँकेचे निकालही नेहमीप्रमाणे आश्वासक आहेत. कोटक मिहद्र बँकने थोडी निराशा केली पण सर्व बँकांच्या निकालातील एक सामायिक मुद्दा म्हणजे थकीत कर्जे व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीतील वाढ! बँकिंग क्षेत्रातील या समस्येचे अजूनही निराकरण झाले नसल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक मोठय़ा बँकांमधे करणे व तरतुदींनीग्रस्त बँकांतील गुंतवणूक टाळणे हितावह आहे.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या तिमाही नफ्यातील वाढ फारशी उत्साहवर्धक नाही. आर्थिक मंदीमुळे नवीन प्रकल्प, तसेच देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे सध्या हातातील प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनीला मर्यादा आल्या आहेत. अर्थातच या अडचणी तात्कालिक आहेत. कंपनीच्या हाती असलेल्या प्रकल्पांचा विचार केला तर पुढील वर्षभरात सरकारतर्फे होणाऱ्या पायाभूत सुविधा व संरक्षण खर्चाची ही एक लाभार्थी कंपनी आहे. अर्थसंकल्पानंतर तसे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे त्यानंतर कंपनीत केलेली गुंतवणूक येत्या दोन वर्षांत फलदायी ठरेल.

जाहीर झालेल्या निकालांमधे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढलेले दिसले तरी विक्रीवर आर्थिक मंदीमुळे झालेला परिणाम कंपन्यांना लपवता आला नाही. कंपन्यांची दीर्घ मुदतीमधील कामगिरी पाहता समभागातील घसरण खरेदीसाठी संधीच आहे. पुढील आठवडय़ात आयसीआयसीआय बँक, बजाज समूहातील कंपन्या, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर या कंपन्यांचे निकाल व अर्थसंकल्पाबाबतचा आशावाद यामुळे बाजारात मोठी उलाढाल राहील. एक तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासाठी बाजारात पुढील शनिवारी खास व्यवहार होतील. त्यानंतरच बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल