सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

जागतिक मंदीच्या तडाख्याने चिंताग्रस्त बाजाराला आर्थिक विकास दर व पायाभूत उद्योगांच्या वाढीचे घसरलेले आकडे, वाहन विक्रीचे घसरलेले आकडे यामुळे अधिकच भयग्रस्त केले. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णयही बाजाराच्या पचनी पडला नाही. कारण भावी काळासाठी हा निर्णय चांगला असला तरी नजीकच्या काळात अधिग्रहण करणाऱ्या बँकांची नफाक्षमता, पत गुणवत्ता आणि कार्यक्षमता यामध्ये समस्या निर्माण होतील. परिणामी सप्ताहाच्या सुरुवातीलाच सरकारी बँकांच्या समभाग मूल्यात सहा ते १२ टक्के तर निर्देशांकांत झालेली मोठी (दोन टक्क्यांहून जास्त) घसरण सध्याच्या पावसाशी स्पर्धा करणारी ठरली. उर्वरित दिवसांत या घसरणीची जरा भरपाई करून सप्ताहाची अखेर सेन्सेक्सने ३५१ तर निफ्टीने ७७ अंशांच्या साप्ताहिक घसरणीने झाली.

घसरत्या विक्रीनंतर मारुती सुझुकीने ऑगस्टच्या उत्पादनांत ३४ टक्के कपात केली होती. सप्टेंबर महिन्यातदेखील कंपनीने वाहन उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत कार बाजारात येण्याची आशा आणि उबर, ओलासारख्या कंपन्यांकडून होणारी स्पर्धा अशा कारणांमुळे मंदीतून जाणाऱ्या वाहन उद्योगात जेव्हा सुधारणा होईल तेव्हा मारुती सुझुकी हा सर्वात आधी चढणारा समभाग असेल. कारण भारतीय वाहन बाजारात कंपनीचा आजही पन्नास टक्क्यांहून जास्त वाटा आहे. त्यामुळे हे समभाग थोडे थोडे जमवत जाण्यासारखे आहेत.

भारतातील उद्योगांची इकोसिस्टीम गेल्या पाच वर्षांपासून वेगाने बदलत आहे. ऑनलाइन व शॉपिंग मॉलमधील खरेदीचे व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे लहान दुकानांना त्याची झळ बसत आहे. नोटाबंदी, रोकड व्यवहारांवरील निर्बंध, वस्तू व सेवा कर, रेरा कायदा यामुळे अनेक अनोंदणीकृत उद्योग (हिरे, जडजवाहीर, बांधकाम क्षेत्र)  बंद पडत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सर्वाना परवडणारे स्मार्ट मोबाईल वाढल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत. पण वित्त क्षेत्रातील नवीन नोकरभरतीवर गदा आली आहे. वर म्हटल्याप्रमाणे ओला, उबरसारख्या कंपन्यांनी वाहन खरेदीवर परिणाम केला आहे. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अनेक जकात नाके, उत्पादन शुल्क तपासणीचे नाके बंद झाले आहेत. परिणामी अधिक गतिशील माल वाहतुकीमुळे मालमोटारींच्या खरेदीतील कपात, ज्यामुळे अवजड वाहन उद्योगांवरील संकटात वाढ झाली आहे. स्टेट बँकेने नुकतेच जाहीर केले आहे की, नजीकच्या काळात डेबिट कार्डची देखील गरज भासणार नाही. कारण मोबाईल अ‍ॅपच एटीएममध्ये वापरात येईल. त्यामुळे डेबिट कार्ड सेवा पुरविणारा उद्योग संकटात येईल. या संक्रमणामुळे  पारंपरिक रोजगार कमी होऊन रोजगाराची नवीन क्षेत्रे तयार होत आहेत. तसेच आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, करसंकलन व उद्योगांची कार्यक्षमता वाढणार आहे. ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी चांगला परिणाम होणार आहे. भारतीय उद्योगांना स्वत:च्या व्यवसाय करण्याच्या पद्धतींमध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी काही काळ जावा लागेल. योग्य बदल कंपन्यांची नफाक्षमता सुधारतील. त्यानंतरच बदलांचे परिणाम बाजाराची वाटचाल निश्चित करतील. दीर्घावधीचा परिणाम सकारात्मकच असल्याने संथ गतीने निर्देशांक नवीन शिखरे स्थापित करतील.