अर्थउभारीबाबत ‘फेड’चा उदासीन पवित्रा

मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेच्या उभारीसंबंधी अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हच्या उदासीन दृष्टिकोनाने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आणि त्याच भीतीचे प्रतिबिंब स्थानिक बाजारात ‘सेन्सेक्स’मधील गुरुवारच्या चार शतकी पडझडीतूनही उमटताना दिसून आले.

निरंतर सुरू निर्देशांकाच्या दौडीत वरच्या भावावर पोहचलेल्या समभागांची विक्री करून झालेली नफावसुली आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा मूल्यऱ्हास यातूनही बाजारात गुरुवारी नरमाईचे वातावरण होते. परंतु मुख्य निर्देशांकांच्या स्मॉल व मिड कॅप समभागांमध्ये खरेदी होऊन या निर्देशांकांची चमकदार कामगिरी सलग दुसऱ्या सत्रात पाहायला मिळाली.

दिवसाचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ३९४.४० अंश (१.०२ टक्के) घसरणीसह ३८,२२०.३९ या पातळीवर स्थिरावलेला दिसला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने ९६.२० अंशांच्या (०.८४ टक्के) नुकसानीसह ११,३१२.२० या पातळीवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. त्या उलट बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात ०.८७ टक्क्य़ांची सकारात्मक वाढ दिसून आली. चलन बाजारात रुपयाचे विनिमय डॉलरमागे २० पैशांनी गडगडून ७५.०२ पातळीवर गेले.