सुधीर जोशी – sudhirjoshi23@gmail.com

या सप्ताहाची सुरुवात, वाहन खरेदीचे घसरलेले आकडे, आर्थिक विकासाचा घसरत जाणारा दर, वस्तू व सेवा कराच्या संकलनातील वाढ, रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दरकपातीची अपेक्षा व प्रत्यक्ष अपेक्षाभंग तसेच अर्थमंत्र्यांचा सध्याचा मंदावलेला विकास दर हा तात्कालिक असल्याचा निर्वाळा अशा अर्थजगतातील संमिश्र वातावरणात झाली. परिणामी पहिले चार दिवस डळमळीत राहिलेल्या बाजाराने पतधोरण जाहीर झाल्यावर नाराजी तीव्रतेने व्यक्त केली.

कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्र्यांना जरी चिंता नसली तरी रिझव्‍‌र्ह बँकेने कांद्यासहित घरगुती वापराच्या आणि अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींची दखल घेत व्याज दर स्थिर ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. भाजीपाल्याच्या किमतीत सतत होत असलेली वाढ, दूध, कडधान्ये तसेच दैनंदिन वापराच्या रोजच्या वस्तूंच्या किमतीच्या भडक्यातून अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने अधिक गंभीर बनली आहेत. सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या संयुक्त उपाययोजनांच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरावर होणाऱ्या परिणामांची वाट पाहणे पतधोरण आढावा समितीने पसंत केले. त्याच वेळी भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा व्याजदर कपातीचे दरवाजे खुले ठेवून बाजाराला दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. तथापि सप्ताहअखेर निर्देशांकात – सेन्सेक्समध्ये ३४८ अंशांची तर निफ्टीमध्ये १३५ अंशांची घट झाली.

मागील सप्ताहातील लेखात म्हटल्याप्रमाणे, आयसीआयसीआय बँकेच्या सवाधिक रोल ओव्हर झालेल्या सौद्यांचा परिणाम या आठवडय़ात समभागाने गाठलेल्या उच्चांकात दिसून आला. शेवटच्या दिवशी बँकांच्या निर्देशांकात घसरण होऊनही या समभागावर फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा समभाग खाली येईल तेव्हा त्यामधील गुंतवणूक वाढवता येईल. स्टेट बँकेने यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील ७.५ टक्यांपर्यंतचा हिस्सा बाजारात विकण्याचा इरादा जाहीर केला आहे. आधी जाहीर केलेला क्रेडिट कार्ड व्यवसायातील चार टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय आणि एस्सार स्टीलच्या थकीत कर्जाच्या वसुलीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अनुकूल निर्णय अशा एकापाठोपाठ चांगल्या बातम्या हा समभाग गुंतवणुकीसाठी आकर्षक बनवत आहेत. स्टेट बँकेच्या भागधारकांना क्रेडिट कार्ड व्यवसायाच्या प्रारंभिक भागविक्रीत राखीव वाटा मिळण्याच्या शक्यतेमुळे सध्याची समभागातील  घसरण ही खरेदीची संधी मानली पाहिजे. पुढील एक वर्षांत ही गुंतवणूक फायदा मिळवून देईल. मंदीने तळ गाठल्याचा अंदाज, प्राप्तिकरामधील सवलतीमुळे ठरावीक कंपन्यांचे सहामाहीचे समाधानकारक निकाल, विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी यामुळे बाजार जास्त खाली येत नाही. परंतु वाढती महागाई व बेरोजगारी, फुगलेली वित्तीय तूट, आगामी व्याज दरकपातीबाबत शंका, चांगल्या कंपन्यांच्या अवास्तव बाजारमूल्यामुळे नवीन खरेदीची धास्ती आणि जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे अनिश्चितता यामुळे गेले काही दिवस विशिष्ट टप्प्यात मार्गक्रमण करणारा बाजार पुढील आठवडय़ात निश्चित दिशा घेतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.