सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांचे जागतिक बाजारांबरोबर भारतीय बाजारामध्येही जोरदार स्वागत झाले व सप्ताहाच्या सुरुवातीलाच निर्देशांकानी ऐतिहासिक मजल गाठली. पाठोपाठ करोनावरील लशीच्या चाचण्या प्रभावी ठरल्याच्या बातमीने बाजारात पुन्हा एकदा ‘त्सुनामी’ आली. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणा आयुर्वेदिक उपचारांसारख्या असल्यामुळे बाजाराच्या हाती लगेच काहीच लागले नाही व जागतिक बाजारांच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या बाजाराने सप्ताह अखेर माघार घेतली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे १,५५० व ४६४ अंकांची वाढ होऊन निर्देशांकांनी दिवाळीची दणक्यात सुरुवात केली. टाळेबंदीमुळे बंद पडलेले उद्योग सुरू व्हायला व रोजगाराची पातळी पूर्ववत होण्यास वेळ लागेल. मागणी सुधारून विकासदरात वाढ होत नाही तोपर्यंत बाजारात येणारी तेजी परदेशी गुंतवणूकदारांकडील रोकड सुलभतेवर अवलंबून असेल. त्यामुळे सध्याच्या बाजाराच्या पातळीत कंपन्यांची चोखंदळपणे निवड करूनच नवीन गुंतवणूक करावी. आजच्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा विचार करता येईल.