सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांत सप्ताहअखेर वाढ नोंदली गेली. संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बहुप्रतिक्षित वस्तू व कर विधेयकाचा मार्ग मोकळा होण्याची आशा गुंतवणूकदारांमध्ये कायम राहिली. परिणामी १६९.५७ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,१२८.२० वर पोहोचला. मुंबई निर्देशांकाचा हा गेल्या तीन आठवडय़ाचा वरचा स्तर होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने त्याचा ७,९०० स्तर शुक्रवारी पार केला.

वस्तू व कर विधेयकाला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्षनेते मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याने हा तिढा सुटण्याचा मार्ग दिसू लागला आहे. त्यातच नोव्हेंबरमधील वायदा पूर्तीचा अखेरच्या दिवसाची संधी साधत गुंतवणूकदारांनी समभागांच्या खरेदीचा सपाटा लावला.
२६ हजारापुढील वाटचाल करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने बंदअखेर ६ नोव्हेंबरनंतर प्रथमच वरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन व्यवहारातील मुंबई निर्देशांकातील वाढ ही ३५२.४६ अंश राहिली आहे. निफ्टीने ७,९०० चा स्तर ओलांडताना सप्ताहअखेर ७,९५९.३० पर्यंत झेप घेतली. तर त्याचा व्यवहारातील तळही ७,८७९.४५ पर्यंतच होता.
बँक, भांडवली वस्तू, पोलाद, सार्वजनिक कंपन्या, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य वाढले. त्यातही स्टेट बँक, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, वेदांता यांची मूल्य आघाडी राहिली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अध्र्या टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर सप्ताहात सेन्सेक्स व निफ्टीने प्रत्येकी एक टक्क्य़ाने वधारले आहेत. दोन्ही निर्देशांकात या कालावधीत अनुक्रमे २५९.७१ व ८६.१५ अंश वाढ झाली आहे.
बाजाराचा प्रवास आता रिझव्‍‌र्ह बँकेचे १ डिसेंबरचे पतधोरण तसेच पुढील आठवडय़ात जाहीर होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या आकडेवारीवर असेल.

बँक समभागांमध्ये उत्साह

बँकांच्या वाढत्या बुडित कर्जाची समस्या निकालात काढण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याच्या सरकरच्या घोषणेनंतर शुक्रवारी बँक समभागांचे मूल्य ६ टक्क्य़ांपर्यंत उंचावले. सार्वजनिकबरोबरच खासगी बँकांच्या समभागांनाही भाव मिळाला. मुंबई शेअर बाजारात एकूण बँक निर्देशांकही जवळपास दोन टक्क्य़ासह सर्वात आघाडीवर राहिला.
स्टेट बँक ऑफ इंडिया रु. २४९.५५ (+२.८०%)
बँक ऑफ बडोदा रु. १७९.२५ (+५.३८%)
पंजाब नॅशनल बँक रु. १४४.३० (+३.२९%)
कॅनरा बँक रु. २७०.८० (+३.२२%)
सिंडिकेट बँक रु. ९४.६० (+५.२३%)
आयडीबीआय रु. ८६.४० (+४.०३%)