सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

चीनमधील करोना विषाणूचा धोका नियंत्रणात आल्याच्या बातम्यांनी उमेदीत आलेला बाजार, नंतर त्याच्या इटली, दक्षिण कोरिया, इराण, नायजेरिया सारख्या नवनवीन देशांतील प्रादुर्भावाने पुन्हा भयग्रस्त बनला आणि सप्ताहाची सुरुवात ते शेवट मोठय़ा घसरणीने झाली. जागतिक बाजारही मोठय़ा फरकाने खाली येत होते व त्याचा भारतीय बाजारावर रोजच परिणाम होत गेला. शुक्रवारच्या मोठय़ा घसरणीनंतर सेन्सेक्समध्ये सज्जड २,८७३ अंशांची तर निफ्टीत ८७९ अंशांची साप्ताहिक घसरण झाली.

चालू वर्षांतील पहिली व बहुप्रतीक्षित एसबीआय कार्ड्सची प्रारंभिक समभाग विक्री पुढील आठवडय़ात सुरू होत आहे. क्रेडिट कार्ड उद्योगातील पहिलीच कंपनी बाजारात प्रवेश करीत आहे. क्रेडिट कार्डचा भारतातील वापर गेल्या वर्षी चार टक्के होता जो इतर प्रगत देशांत चाळीस ते शंभर टक्के आहे. डिजिटल इंडियाच्या वाढत्या प्रगतीत सहभागी असणाऱ्या या कंपनीच्या समभाग विक्रीला प्रचंड प्रतिसाद अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांना ही एक चांगली संधी आहे.

गुरुवारी फेब्रुवारी महिन्याच्या सौदापूर्तीचे आकडे हाती आले. सेन्सेक्स आणि निफ्टीतील प्रभावी कंपन्यांच्या घसरणीमुळे निफ्टी आणि बँक निफ्टी फ्युचर्स सौदापूर्तीवेळी त्यांच्या सर्वोच्च शिखरापासून सात टक्क्यांनी घसरले. परंतु या महिन्यांत स्मॉलकॅप निर्देशांक १० टक्क्यांनी तर मिडकॅप निर्देशांक पाच टक्क्यांनी वधारले. मागील तीन महिन्यांच्या सरासरीपेक्षा (८९ टक्के) फेब्रुवारीत केवळ ८६ टक्के ‘रोल ओव्हर’ झाले आहे. सर्वाधिक सौदे ११,८०० ते ११,६०० दरम्यान झाले आहेत. स्टॉक फ्युचर्सच्या ‘रोल ओव्हर’चे आकडे पाहता, बँक ऑफ बडोदा आणि बजाज फायनान्समध्ये अल्पकाळात नफा कमावण्याची संधी उपलब्ध होईल.

सध्या सुरू असलेली बाजाराची पडझड ही खरेदीची संधी आहे. कारण हा एक ‘ब्लॅक स्वान इव्हेंट’ म्हणजे अकस्मात येणारे संकट आहे. ज्याची चाहूल लागणे कुणालाच शक्य नव्हते. ते किती काळ राहील हे सांगता येत नसले तरी त्याचा काळ मर्यादित असेल. त्यामुळे उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे समभाग टप्प्याटप्प्याने जमविणे हितावह ठरेल.

पुढील आठवडय़ाच्या व्यवहारांवर करोना विषाणूमुळे जागतिक बाजारातील पडझडीची छाया असेल तसेच सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे तिमाही आकडे, महिन्यातील वाहन विक्री, वस्तू सेवा कर संकलन बाजाराची दिशा ठरवतील.