सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धाचे वातावरण निवळण्याच्या संकेतांमुळे जगातील सर्वच बाजारांनी या सप्ताहात उभारी घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या आर्थिक वाढीचा दर २०१९ मध्ये सहा टक्क्यांपर्यंत खाली येणार असला तरी २०२० मध्ये तो परत सात टक्क्यांवर जाण्याचे केलेले भाकीत आणि आतापर्यंत जाहीर झालेले विविध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे फारसे वाईट नसलेले निकाल यामुळे भारतीय बाजाराचे निर्देशांक प्रत्येक दिवशी वर जात राहिले. गुरुवारी ब्रेग्झिट करार सफल झाल्याच्या बातमीमुळे बाजाराला भावनिक दिलासा मिळून सेन्सेक्सने ३९,०००चा टप्पा ओलांडला. आठवडय़ाची अखेर सेन्सेक्स १,१७१ अंश, तर निफ्टी ३५६ अंशांच्या साप्ताहिक वाढीने झाली.

गेल्या आठवडय़ात जाहीर झालेले इन्फोसिस व डी-मार्टचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले असूनही या आठवडय़ात त्यांच्या बाजार मूल्यात फारशी वाढ दिसली नाही. कारण बाजाराने त्यांच्या अपेक्षित निकालांची दखल आधीच घेतली होती. असा अनुभव बऱ्याच वेळा येतो. परंतु इन्फोसिसमधील घसरण गुंतवणुकीची संधी ठरेल. हिंदुस्तान युनिलिव्हरने दुसऱ्या तिमाहीत आपल्या कारभारात मंदीच्या काळातही पाच टक्क्यांची वाढ व २० टक्के वाढीने करपश्चात नफा कमावला आहे. अडचणीच्या काळातही ग्राहक उपभोग्य व्यवसायत टिकून राहण्याची क्षमता तिने सिद्ध केली आहे. लांबलेल्या मोसमी पावसामुळे सिमेंट विक्रीवर परिणाम झाला तरी खर्चाचे प्रमाण आटोक्यात ठेवून एसीसीने नफ्यात ४५ टक्के वाढ केली. पुढील तिमाहीत सिमेंटची मागणी वाढून एसीसी, अल्ट्राटेकसारख्या कंपन्या चांगली कामगिरी करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची या सप्ताहात सहा टक्क्यांहून जास्त वाढ होऊन नऊ लाख कोटींहून जास्त बाजारमूल्य असणारी ती पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालांबाबत बाजार मोठय़ा अपेक्षा ठेवून आहे. पुढील सप्ताहात सोमवारच्या सुटीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज व एचडीएफसी बँकेच्या निकालांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

महानगर गॅसचे समभाग गेल्या काही दिवसांपासून वर जात आहेत. गेल्या दीड वर्षांत शेल कंपनीने महानगर गॅसमधील आपला ३२ टक्के वाटा विकून टाकला आहे. त्यामुळे समभागांवर नवीन विक्रीचा दबाव कमी झाला आहे. कंपनी या वर्षांत ४६ नवीन गॅस वितरण केंद्रे स्थापन करणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांवर ‘बीएस-६’ नियमावली २०२० पासून लागू करण्याचा सरकारचा इरादा कंपनीच्या पथ्यावर पडणारा आहे. दीर्घ मुदतीत हे समभाग फायदा देऊन जातील.

जागतिक मंदीसदृश स्थितीमुळे बाजार गेल्या तिमाहीच्या निकालांकडून खूप मोठय़ा अपेक्षा ठेवत नसला तरी कंपनी व्यवस्थापनाच्या आगामी काळातील वाटचालीच्या अंदाजांवर नजर ठेवून आहे तसेच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यासाठी सरकारकडून काही घोषणांच्या प्रतीक्षेत आहे. या सप्ताहाचे वैशिष्टय़ म्हणजे अनेक मिड कॅप कंपन्यांमध्ये तेजीचे वातावरण दिसले. पुढील आठवडय़ात अ‍ॅक्सिस, कोटक, एचडीएफसी बँका तसेच बजाज समूहातील वित्त कंपन्यांच्या तिमाही निकालानी बँक-निफ्टी निर्देशांकाला पाठबळ दिले तर दिवाळीचा माहोल बाजारात नक्कीच दिसेल.