मुंबई : सरकारी कंपन्या तसेच खासगी दूरसंचार कंपन्यांबाबत बुधवारी उशिरा जाहीर झालेल्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी वरच्या टप्प्यावरील समभागमूल्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी गुरुवारी व्यवहार करताना अवलंबिले.

७६.४७ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ४०,५७५.१७ पर्यंत तर ३०.७० अंश घसरणीने निफ्टी ११,९६८.४० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक जवळपास अर्ध्या टक्क्यांपर्यंत खाली आले.

बुधवारच्या निर्देशांक तेजीने सेन्सेक्स तसेच निफ्टी वरच्या टप्प्यावर पोहोचले होते. त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून ते काही अंशीच दूर होते. गुरुवारी मात्र त्यावर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचा दबाव निर्माण झाला. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक बुधवारच्या तुलनेत खाली आले.

सरकारच्या निर्णय धडाडीमुळे भांडवली बाजारातील सूचिबद्ध सरकारी कंपन्यांसह खासगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांवरही गुरुवारी विक्री दबाव राहिला. वरच्या टप्प्यावरील या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधली. परिणामी बीपीसीएल, एससीआय, कॉन्कॉर तसेच व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांचे समभागमूल्य घसरले.