फेसबुकची फ्री बेसिक सेवा तूर्त थांबवण्यात यावी, असा आदेश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ‘ट्राय’ने रिलायन्स कम्युनिकेशन्सला दिला आहे. आम्ही या कंपनीला ही सेवा तूर्त थांबवण्यास सांगितले असून त्यांनीही त्याचे पालन करण्याचे वचन दिले आहे, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स ही फेसबुकची दूरसंचार भागीदार कंपनी मूलभूत इंटरनेट सेवा मोफत देत आहे. ‘फ्री बेसिक सेवा’ असे या सेवेच्या बऱ्याच मोठय़ा जाहिरातीही करण्यात आल्या होत्या, यापूर्वी या सेवेचे नाव इंटरनेट डॉट ओआरजी होते. आता फ्री बेसिकवर अनेक तज्ज्ञांनी टीका केली असून ही योजना इंटरनेट समानतेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. ट्रायने फ्री बेसिक सेवेबाबत अजूनही कुठले मत बनवलेले नाही. दूरसंचार कंपन्यांना वेगळ्या आशयासाठी वेगळी किंमत आकारण्याची परवानगी असावी का हा यातील प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय फ्री बेसिकबाबत भूमिका स्पष्ट करणे शक्य नाही. इंटरनेट समानता याचा अर्थ दूरसंचार कंपन्यांनी सर्व प्रकारचा आशय त्याचा स्रोत न बघता व कुठलाही पक्षपात न करता तसेच कुठल्याही संकेतस्थळांना किंवा उत्पादनांना आडकाठी न करता उपलब्ध करून देणारी सेवा होय. याबाबत कंपनीने काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. फेसबुकने जी प्रश्नावली जाहीर केली होती त्यालाही रात्रीपर्यंत कुणीच उत्तरे दिलेली नाहीत. रिलायन्सने फ्री बेसिक सेवा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे पण आता दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या आदेशाला ते कितपत बांधील राहतात हा प्रश्न आहे. प्राधिकरणाने दोन आठवडय़ांपूर्वीच हा आदेश दिला आहे.