व्यवस्थापनाने १५ एप्रिलपर्यंत नवीन वेतनवाढ करारावर स्वाक्षरी करण्यास तसेच संघटनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांवरील निलंबन बिनशर्त मागे घेण्यास मान्यता दिल्यानंतर येथील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीत तीन दिवसांपासून सुरू असलेले ‘टूल डाउन’ आंदोलन गुरूवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे कंपनीचे सुमारे ८० कोटीचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या व्यवस्थापनाने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे संतप्त कामगारांनी मंगळवार दुपारपासून ‘टूल डाउन’ आंदोलन सुरू केले. बुधवारी हा तिढा सुटावा म्हणून व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली. तर व्यवस्थापनाने आधी आंदोलन मागे घेण्याचा आग्रह धरला. तोडगा निघत नसल्याने कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी प्रथम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नंतर कंपनी व्यवस्थापनाशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
गुरूवारी कामगार उपायुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा बैठक झाली. या बैठकीत व्यवस्थापनाने संघटनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांवरील निलंबन बिनशर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच १५ एप्रिलपर्यंत नवीन वेतनवाढ करारावर स्वाक्षरी केली जाईल. हा करार ६ फेब्रुवारी २०१२ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात येईल, असा होकार दर्शविला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता दिली. यावेळी झालेल्या चर्चेत उपायुक्त आर. एस. जाधव, कंपनीकडून महाव्यवस्थापक अनिल गोडबोले, उत्पादन प्रमुख एन. के. देशमुख तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिरीष भावसार, उपाध्यक्ष अमोल सोनवणे, सरचिटणीस प्रविण शिंदे यांनी सहभाग घेतला. बैठक संपवून सर्व मंडळी उपोषणस्थळी आल्यावर उपस्थित कामगारांनी करार आजच करण्याचा हट्ट धरला. उपायुक्तांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून त्यांनी काढता पाय घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचेही कोणी ऐकले नाही. अखेर सिटूचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड यांनी कामगारांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, या आंदोलनामुळे सुमारे एक हजार वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून अंदाजे ८० कोटी रूपयापर्यंत नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.