अमेरिकेसह युरोपातील नवीन करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण संथावल्याचा आणि त्या परिणामी जगातील विकसित अर्थव्यवस्थांवरील टाळेबंदी फास सैल होण्याच्या शक्यतेने जागतिक भांडवल बाजार तेजीचे स्थानिक बाजारातही मंगळवारी उमटले. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी जवळपास नऊ टक्क्यांच्या उसळीसह, मे २००९ नंतरची दिवसातील सर्वोत्तम वाढीची नोंद केली.

जागतिक स्तरावरील भांडवली बाजारातील उत्साही वातावरण, त्याचप्रमाणे वस्तू बाजारपेठेतील जोमदार सुधारणेचे प्रतिबिंब स्थानिक भांडवली बाजारातही उमटताना दिसले. बाजारावरील तेजीवाल्यांनी मंगळवारी इतकी मजबूत पकड बसविली की, सेन्सेक्स निर्देशांकातील सर्व ३० समभागांचे मूल्य दमदार वधारले. परिणामी दिवसअखेर २,४७६.२१ अंशांची उसळी घेत या निर्देशांकाने ३० हजारांपल्याड ३०,०६७.२१ अंशावर विश्राम घेतला. तुलनेने व्यापक पाया असणाऱ्या ५० समभागांच्या निफ्टी निर्देशांकाने ७०८.४० अंशांची झेप घेत दिवसअखेर ८,७९२.२० अंशांची पातळी गाठली.

दोन्ही निर्देशांकांच्या मंगळवारच्या पावणेनऊ ते नऊ टक्क्यांच्या उसळीने गुंतवणूकदारांच्या झोळीत एका दिवसात ७.७१ लाख कोटी रुपयांची भर घालणारी किमया साधली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचे सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १.१६ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

औषधांच्या निर्यातीबरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र  सरकारने घेतला, त्या परिणामी बाजारात औषध निर्मात्या कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी दिसून आली. कॅडिला हेल्थकेअर, ऑरबिंदो फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरी या समभागांमधील १० ते १४ टक्क्यांपर्यंतच्या वाढीच्या परिणामी निफ्टी फार्मा निर्देशांकांने ९.५ टक्क्यांनी वाढ दाखविली.