आर्थिक सहकार्य करण्यास देशी-विदेशी कंपनी पुढे येत नसल्याने अद्यापही किंगफिशर एअरलाइन्सची विमाने जमिनीवर असतानाच भारतीय हवाई सेवा कंपन्यांमध्ये विदेशी निधी ओतण्याच्या चर्चेला अचानक जोर चढला आहे. मारन समूहाच्या स्पाईसजेटमध्ये मलेशियाची एअर आशिया तर नरेश गोयल प्रवर्तित जेट एअरवेजमध्ये अबुधाबीची इथियाद एअरवेज हिस्सा खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जेट आणि स्पाईसजेट या दोन्ही भारतीय हवाई सेवा कंपन्या आपला काही हिस्सा विदेशी कंपन्यांना विकण्यास तयार असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने देत आज खळबळ उडवून दिली. इथियाद, एअर आशिया, कतार एअरवेज यासारख्या काही खाजगी विदेशी विमान वाहतूक कंपन्यांनी भारतीय खाजगी हवाई कंपन्यांमध्ये हिस्सा खरेदीसाठी रस दाखविल्याची माहिती याच विभागातील अधिकाऱ्याने दिली.
जेटने येत्या ४५ दिवसांमध्ये कंपनीतील मोठा हिस्सा इथियादला देण्याची तयारी चालविली आहे. तर स्पाईसजेटही अशाच प्रकारच्या व्यवहारासाठी एअर आशियाबरोबर चर्चेची सज्जता केली आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांनी सल्लागाराची नियुक्ती केली असून काही महिन्यांमध्येच हे व्यवहार पूर्ण होतील, असा आशावादही सरकारी सूत्रांनी व्यक्त केला. जेटसाठी इथियाद तर स्पाईसजेटच्या स्पर्धेत दोन विदेशी कंपन्या आहेत.
भारतीय हवाई कंपन्यांमध्ये ४९ टक्क्यांपर्यँत थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. गेल्याच आठवडय़ात स्पाईसजेटच्या प्रवर्तकांच्या कथित हिस्सा विक्रीबाबत कंपनीला खुलासा करणे भाग पडले होते. स्पाईसजेटमध्ये सर्वाधिक हिस्सा असणाऱ्या कलानिधी मारन यांनी त्यांच्या पत्नीसह ‘काल एअरवेज’ या प्रवर्तक कंपनीच्या संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत.
तथापि सर्वाधिक गरजवंत असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सबाबत मात्र सध्या तरी कोणतीच घडामोड दिसत नाही. किंगफिशरला १०० कोटी डॉलरचे अत्यावश्यक भांडवल मिळविण्यासाठी तिला कर्ज देणाऱ्या बँकांनी घातलेली अंतिम मुदत चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. बँकांच्या थकलेल्या ७ हजार कोटींच्या कर्जासह किंगफिशरवर १५ हजार कोटी रुपयांचा भार आहे. १९ ऑक्टोबरपासून कंपनीचा हवाई उड्डाणाचा परवानाही स्थागित आहे.

दिवसभराच्या विदेशी गुंतवणुकीच्या चर्चेचा शेअर बाजारात सूचिबद्ध तिन्ही हवाई वाहतूक कंपन्यांना रग्गड लाभ झाला. गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या तेजीने जेट आणि स्पाइसजेटच्या भावांनी वर्षांतील उच्चांकाला स्पर्श केला.
स्पाइस जेट   रु. ४४.४०      + १३%
जेट एअरवेज  रु. ५६०.४०   +११%
किंगफिशर    रु. १४.४०       +५%