नवी दिल्ली : अर्थमंत्रालयातील महत्त्वाच्या खात्यातून अन्यत्र बदली करण्यात आलेल्या सुभाष चंद्र गर्ग यांनी त्यानंतर अवघ्या एका दिवसातच स्वेच्छानिवृत्तीची इच्छा प्रदर्शित केली आहे. यानुसार केवळ तीन महिनेच ते नव्या जागी राहतील, असे मानले जाते.

केंद्रीय अर्थ व्यवहार सचिवपदी राहिलेल्या ५८ वर्षीय गर्ग यांची बुधवारी केंद्रीय ऊर्जा खात्यात बदली करण्यात आली. केंद्रीय अर्थ व्यवहार खात्याच्या तुलनेत ऊर्जा खाते हे काहीसे कमी महत्त्वाचे मानले जाते.

म्हणूनच गर्ग यांनी नव्या पदावरही अधिक काळ राहण्याबाबत नापसंती व्यक्त केल्याचे मानले जाते. गर्ग यांनी गुरुवारी सकाळी ट्विटद्वारे स्वेच्छानिवृत्तीकरिता अर्ज केला असल्याचे सांगताना, ३१ ऑक्टोबर हा आपला सनदी सेवेतील अखेरचा दिवस असेल, असे स्पष्ट केले आहे.

नव्या खात्याचा कार्यभार गर्ग शुक्रवारी घेणार असून स्वेच्छानिवृत्तीकरिता तीन महिन्यांचा पूर्वसूचना कालावधी ते पूर्ण करणार आहेत. केले. गर्ग यांची प्रत्यक्षात निवृत्ती वयाच्या ६० व्या वर्षी म्हणजे २०२० सालात अपेक्षित होती.