शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ७४.८२ कोटी तत्काळ सव्याज फेडण्याचे आदेश

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख आणि अन्य आठ नातलग संचालक असलेल्या लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजवर भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने बंदी आदेश बजावला आहे. गुंतवणूकदार शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे ७४.८२ कोटी रुपयांचा निधी गोळा केला आणि या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका या कंपनीवर असून, वार्षिक १५ टक्के व्याज दराने या निधीच्या तत्काळ परतफेडीचाही सेबीचा आदेश आहे.

देशमुख पती-पत्नीसह, वैजनाथ लातुरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुराण्णा तेली, महेश देशमुख आणि पराग पाटील असे सेबीकडून कारवाई झालेले लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे नऊ संचालक आहेत. पुढील किमान चार वर्षे या सर्वाना भांडवली बाजारात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. या सर्वाना त्यांची स्थावर-जंगम मालमत्ता, बँक खाती, डीमॅट खाती आणि समभाग आणि अन्य गुंतवणुकांची माहिती सेबीने मागवली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे फेडले जात नाहीत तोवर या सर्वाच्या विक्री व्यवहारावर र्निबध आले आहेत. लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अंतर्गत येणाऱ्या साखर कारखान्यातील शिल्लक साठय़ाची पूर्ण माहितीही सेबीने मागविली आहे.

लोकमंगल अ‍ॅग्रोने २००९ सालापासून सोलापूर परिसरातील ४७५१ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भागधारक म्हणून नोंदवून घेत त्यांच्याकडून ७४.८२ कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. कंपनी कायद्यातील कलमांचा भंग करीत बेकायदेशीरपणे भागधारक बनवून हा निधी उभा केला गेला. शिवाय भागभांडवल म्हणून गोळा केलेल्या रकमेचा गैरवापरही केला गेल्याचा सेबीचा ठपका आहे.

सेबीने १ ऑगस्ट २०१६ रोजी या संबंधाने कंपनीवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर, जमीन, इमारती तसेच प्रकल्प व यंत्रसामग्री अशी कंपनीच्या मालकीची २२२.७८ कोटी रुपयांचे मूल्य असलेली मालमत्ता असल्याचे लोकमंगल अ‍ॅग्रोने नमूद केले आणि एप्रिल २००९ पासून वार्षिक कमाल १० टक्के व्याजदरासह एकूण १२२.८६ कोटी रुपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव सेबीपुढे ठेवला होता. तो अमान्य करीत सेबीने १५ टक्के व्याजदरासह परतफेडीचा आदेश दिला आहे.