स्वामी यांची सीबीआय चौकशीची मागणी

रिझव्‍‌र्ह बँकेने गतवर्षी १० सूक्ष्म वित्त बँकांना (स्मॉल फायनान्स बँक) परवान्यांना तत्त्वत: मंजुरी देताना आपल्याच नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करीत भाजप नेते सुब्रह्मण्यन स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना टीकेचे लक्ष्य करीत स्वामी यांनी विदेशी भांडवली मालकी असताना, परिणामी सूक्ष्म वित्त बँक म्हणून परवान्यासाठी अपात्र असताना, या नियमाकडे कानाडोळा केला गेला असा आरोप केला आहे. राजन यांना व्याजाचे दर खाली आणण्यात व पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अपयश आले या आधी केलेल्या आरोपांची री ओढत, परवाने मंजुरीत त्यांनी ‘कर्तव्यपालन न केल्याचे’ किंबहुना दुष्टहेतूने केला गेलेला हा निष्काळजीपणा असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. माजी अर्थमंत्र्यांचे स्नेही असलेल्या राजकारणी आणि नोकरशहांनी गैरव्यवहार करून मिळविलेला निधीचा या कथित नियमबाह्य़ परवाने मंजुरीशी संबंध असण्याचा संशय असून, गव्हर्नर राजन यांचीही या घोटाळ्यांसंबंधाने सीबीआय वा विशेष तपास दलाकडून चौकशी केली जावी, असे स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सुचविले आहे. परवाने मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या सर्व संस्थापैकी बहुतांशांना एकाच समुदायाकडून चालविल्या जाणाऱ्या विदेशी संस्थेचे अर्थसाहाय्य व पाठबळ आहे, असा स्वामी यांचा दावा आहे.