साखर कारखानदारांनी सक्षम होण्याबरोबरच साखर उद्योगाने नफ्याचा व्यवसाय व बहुविध उत्पादने सादर करावे, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी केले. साखर कारखान्यांना लागणाऱ्या ऊसाच्या किंमती कमी केल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उद्योगाने सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहू नये, असा सल्लाही केंद्रीय मंत्र्यांनी दिला.

साखर कारखान्यांची संघटना ‘आयएसएमए’च्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गोयल संबोधित करत होते.

२०२०-२१ करिता ६० लाख टन साखरेच्या निर्यातीकरिता केंद्र सरकारने देऊ केलेल्या ३,५०० कोटी रुपयांच्या अनुदानाचा निर्णय साखरेच्या अतिरिक्त साठा निर्मितीस पूरक ठरेल, असे मत गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.

ऊसाच्या किंमती साखरेशी निगडित करण्याच्या या क्षेत्राच्या मागणीचा उल्लेख करत गोयल यांनी ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी इथेनॉलरसारखी अन्य उत्पादनेही घ्यायला हवीत, असे ते म्हणाले.