25 February 2021

News Flash

सन फार्माचा ‘त्वचा निगे’च्या व्यवसायात प्रवेश; ३० टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य

‘सन फार्मा’ने या क्षेत्राने अधिक वेगाने मुसंडीसाठी त्वचा निगेच्या क्षेत्रात प्रवेशाची बुधवारी येथे घोषणा केली.

अलीकडच्या ग्राहक आरोग्यनिगा क्षेत्रात आणि पर्यायाने ओटीसी उत्पादनांची प्रस्तुती करणाऱ्या अग्रणी औषधी निर्मात्या ‘सन फार्मा’ने या क्षेत्राने अधिक वेगाने मुसंडीसाठी त्वचा निगेच्या क्षेत्रात प्रवेशाची बुधवारी येथे घोषणा केली. अतिनील व घातक सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणाऱ्या सनक्रॉस या सनस्क्रीन उत्पादनाच्या नाममुद्रेचेही कंपनीने अनावरण केले.
सन फार्माने ग्राहक आरोग्यनिगा क्षेत्रात आजवर पूरक पोषणाहार, वेदनाशामक आणि आम्लतत्त्वनाशक उत्पादने प्रस्तुत केली आहेत. प्रामुख्याने रॅनबॅक्सीचे सन फार्माकडून केल्या गेलेल्या संपादनानंतर हा व्यवसाय विभाग अस्तित्वात आला. आता त्वचा निगा हा या व्यवसाय क्षेत्राला जोडला गेलेला चौथा महत्त्वाचा स्तंभ असल्याचे सन फार्माच्या या व्यवसाय विभागाचे प्रमुख सुबोध मारवाह यांनी सांगितले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्रेत्यांकडे सहजपणे उपलब्ध असलेल्या (ओटीसी) उत्पादन वर्गवारीत त्यामुळे भारतीय बाजारातील एक महत्त्वाचा स्पर्धक बनण्याच्या सन फार्माच्या मानसालाही मोठे बळ मिळणार आहे.
सनक्रॉस या नाममुद्रेसाठी सन फार्माने अभिनेत्री दिया मिर्झाला सदिच्छादूत म्हणून करारबद्ध करीत असल्याची याप्रसंगी घोषणा केली. वार्षिक २५ टक्के दराने विकसित असलेली सनस्क्रीन उत्पादनांची भारतात ३८० कोटी रुपयांची बाजारपेठ असल्याचे अंदाजण्यात आले आहे. सनक्रॉसच्या साहाय्याने या बाजारपेठेतील ३० टक्के हिस्सा काबीज करण्याचे लक्ष्य असल्याचे सन फार्माच्या भारतीय व्यवसायाचे मुख्याधिकारी अभय गांधी यांनी सांगितले.

अपना सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय ५,००० कोटींवर
मुंबई : अपना बँकेचा पारदर्शी व्यवहार हा सहकारी बँकांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री चद्रकांतदादा पाटील यांनी काढले. अपना बँकेने मार्च २०१६ अखेर ५ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केल्यानिमित्त बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष दत्ताराम चाळके व संचालक मंडळाचा गौरव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सहकारमंत्री पाटील पुढे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी संचालकांचा सत्कार करणे ही खरच भाग्याची बाब आहे. देशातील इतर बँकांची कामगिरी पाहता सहकार क्षेत्रातील बँका अधिक प्रभावीपणे सामान्यांसाठी कार्य करताना दिसत आहे. सरकारी बँकांच्या कठीण परिस्थितीतही अपना बँकेने केलेला पाच हजार कोटींचा व्यवसाय हा विशेष उल्लेखनीय आहे.
सहकार चळवळ टिकण्यासाठी अपना बँकांसारख्या बँका अधिक जोमाने वाढल्या पाहिजेत त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल. बँकांकडे कर्जदारांचा ओघ कमी होवू लागल्याची खंत व्यक्त करून त्यांनी नविन लघु उद्योगांना बँकांनी वित्त पुरवठा करावा जेणेकरून राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणांना अधिक पाठबळ मिळेल असे प्रतिपादन केले. अपना बँकेचा लवकरच १० हजार कोटींचा व्यवसाय पूर्ण होईल अशा शुभेच्छा सहकार मंत्र्यांनी दिल्या.

अ‍ॅक्सिस बँकेच्या ‘हरित रोख्यां’ची  लंडन शेअर बाजारात सूचिबद्धता
व्यापार प्रतिनिधी. मुंबई
आशिया खंडातून जारी झालेले व आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच सूचिबद्ध झालेल्या प्रमाणित हरित रोख्यांची ६ जून २०१६ रोजी लंडन शेअर बाजारात सूचिबद्धता आणि व्यवहार सुरू करून भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँकेने एका अतुलनीय कामगिरीचा टप्पा पार केला. क्लायमेट बॉण्ड्स स्टँडर्ड बोर्डद्वारे प्रमाणित या रोख्यांद्वारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी अ‍ॅक्सिस बँकेने उभारला आणि भारतातील हरित ऊर्जा प्रकल्प, वाहतूक आणि पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांमध्ये तो गुंतविला जाणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या एकंदर ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मीडियम टर्म नोट (एमटीएन) कार्यक्रमांतर्गत जारी झालेले हे पहिले हरित रोखे आहेत. २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॉट वीज अक्षय्य ऊर्जा पर्यायातून उभारण्याच्या वचनबद्धतेच्या अनुरूप हे ‘ग्रीन बॉण्ड्स’ बाजारात आणले गेले. हा प्रसंग साजरा करताना, लंडन स्टॉक एक्सचेंज पीएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लंडन स्टॉक एक्सचेंज समूहाच्या आंतरराष्ट्रीय विकास विभागाचे संचालक निखिल राठी यांनी पंतप्रधानांचे पायाभूत विकास उपक्रमाचे ब्रिटनमधील दूत खासदार आलोक शर्मा आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचे स्वागत केले आणि त्यांच्या हस्ते सोमवारी सकाळी लंडनमधील नियमित व्यवहारांचा घंटानाद करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 7:14 am

Web Title: sun pharma enters into skin care business
Next Stories
1 खनिज तेल २०१६च्या उच्चांकावर
2 गजानन ऑइलचा ब्रँडेड खाद्यतेल बाजारात शिरकाव
3 भारतात २०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे अ‍ॅमेझॉनचे नियोजन
Just Now!
X