अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा

भारतातील आघाडीच्या औषध उत्पादक सन फार्माला पुन्हा एकदा अमेरिकेच्या नियामकाने बजाविले आहे. कंपनीच्या गुजरातमधील नव्या औषधांसाठीचा निर्वाणीचा इशाराच देण्यात आला आहे.
याबाबतची सूचना कंपनीला प्राप्त झाली असून त्याबाबत नव्याने तपासणी होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेला स्पष्टीकरणही दिले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. कंपनीला मिळालेला हा इशारा सप्टेंबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीनंतरचा आहे. कंपनीच्या हलोल प्रकल्पातून तयार होणाऱ्या औषधांपैकी १५ टक्के विक्री ही अमेरिकेत होती.
भारतीय औषध उत्पादक कंपन्यांना अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाईला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. भारतीय कंपन्या त्यांच्या एकूण औषध निर्मितीपैकी तब्बल ४० टक्क्य़ांपर्यंतचा व्यवसाय अमेरिकासारख्या देशांमध्ये विकतात. गेल्या काही कालावधीत वोकार्ड्ट, रेनबॅक्झी आदी कंपन्यांनाही तेथील अन्न व औषध प्रशासनाने बडगा उगारला.

समभागही उतरला
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत सन फार्माच्या गुजरातमधील हलोल औषध उत्पादन प्रकल्पाकरिता निर्वाणीचा इशारा प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा बाजारातील सूचिबद्ध समभाग सोमवारी कमालीचा आपटला. सेन्सेक्समध्ये घसरणीत अग्रस्थानी असलेल्या या समभागाने व्यवहारात तब्बल ७.३९ टक्क्य़ांपर्यंत मूल्य घसरण नोंदविली.
दिवसअखेर कंपनीचा समभाग शुक्रवारच्या तुलनेत ४.५ टक्क्य़ांनी घसरत ७५४.४५ रुपयांवर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात समभाग ४.५४ टक्क्य़ांनी घसरून ७५४.२० रुपयांवर आला. समभागांच्या सुमार कामगिरीमुळे कंपनीची मालमत्ता एकाच दिवसात ८,६५४.५९ कोटी रुपयांनी बाजारातून गेली. कंपनीचे एकूण बाजारमूल्य दिवसअखेर १,८१,५६६.४१ कोटी रुपयांवर आले.