सलग चार सत्रांतील सेन्सेक्स, निफ्टीतेजीला सप्ताहारंभीच पायबंद

गेल्या सलग चार सत्रापासून सुरू असलेल्या तेजीपासून भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारांभीच फारकत घेताना त्यांच्या ऐतिहासिक टप्प्यापासूनही माघार घेतली. वरच्या मूल्यस्तरावरील समभागांच्या विक्रीचे धोरण अनुसरत गुंतवणूकदारांनी सोमवारी प्रमुख निर्देशांकांना शुक्रवारच्या तुलनेत किरकोळ घसरण नोंदविण्यास भाग पाडले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८.८८ अंश घसरणीसह ४१,६४२.६६ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९.०५ अंश घसरणीने १२,२६२.७५ पर्यंत स्थिरावला. सलग चौथ्या सत्रात तेजी नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी गेल्या सप्ताहअखेरिस विक्रमी टप्पा गाठला होता. सेन्सेक्स यावेळी ४१,७०० च्या तर निफ्टी १२,३०० समीप होता.

समूहाचा विदेशी तेल व्यावसायिक भागीदार असलेल्या सौदी आराम्कोला २० टक्के हिस्सा विकण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या निर्णयाबाबत सरकारने स्पष्टीकरण मागितल्याने कंपनीचा भांडवली बाजारात सूचिबद्ध समभाग जवळपास २ टक्क्य़ांपर्यंत घसरला. याहून अधिक प्रमाणात नेस्ले इंडियाचा समभाग सेन्सेक्सच्या यादीत खाली आला. कंपनीचा मुंबई निर्देशांकाच्या यादीतील सोमवारचा पहिलाच सत्र व्यवहार होता. त्याचबरोबर स्टेट बँक, टेक महिंद्र, आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र आदींचे मूल्यही घसरले.

किरकोळ निर्देशांक घसरणीतही मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, कोटक महिंद्र बँक, बजाज ऑटो, बजाज फायनान्स आदींचे मात्र मूल्य वाढले. सेन्सेक्समध्ये येस बँक, वेदांता, टाटा मोटर्स यांची जागा आता टायटन कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांनी घेतली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, बहुपयोगी वस्तू निर्देशांक १.३३ टक्क्य़ांनी घसरले. तर वाहन, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक अध्र्या टक्क्य़ापर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप अवघ्या ०.०९ टक्क्य़ांपर्यंत घसरले.