News Flash

गुंतवणूकदारांना दशलक्ष कोटींनी श्रीमंत करणाऱ्या २०१९ ची अखेर निर्देशांक घसरणीने

वर्ष २०१९ ची अखेर करताना मुंबई निर्देशांक एकाच व्यवहारात तब्बल ३०० हून अधिक अंशांनी आपटला.

  • वर्षभरात सेन्सेक्सचा १४.३७ टक्के परतावा
  • स्मॉल-मिड कॅप सलग दुसऱ्या वर्षी नकारात्मक

नवनवे उच्चांक नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने मावळलेल्या २०१९ वर्षांत गुंतवणूकदारांना दुहेरी अंकात परतावा दिला. रिलायन्सच्या रूपात प्रथमच १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद झालेल्या, सेन्सेक्सने सरत्या वर्षांत ४१ हजारांचे अभूतपूर्व शिखरही सर केले. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य १५५.५३ लाख कोटींच्या पल्याड गेले.

वर्ष २०१९ ची अखेर करताना मुंबई निर्देशांक एकाच व्यवहारात तब्बल ३०० हून अधिक अंशांनी आपटला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात पाऊणशेहून अधिक अंशांची घसरण झाली. मात्र सेन्सेक्स व निफ्टी २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये वाढते राहिले.

अमेरिका-चीन व्यापार युद्ध, खनिज तेल-सोने यांचे वाढते दर, रोडावते कर संकलन, विकास दर-महागाई दराबाबतची अस्वस्थता, अर्थव्यवस्थेच्या उभारासाठी मोदी सरकारने घेतलेली निर्णय माघार, बँक-बिगर वित्त संस्थेतील अर्थसंकट आदी घडामोडींचे विपरीत परिणाम नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराची वर्षअखेर मात्र पाऊण टक्के घसरणीने झाले.

मुंबई निर्देशांकात वर्षभरात ५,१८५.४१ अंश, तर निफ्टीत १,३०५.९० अंश भर पडली. अनुक्रमे १४.३७ व १२.०२ टक्के ही वाढ आहे. तर मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र उणे स्थितीत राहिले. हे दोन्ही निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे पाच व ११ टक्क्यांनी खाली आले. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांनी सलग दुसऱ्या वर्षांत घसरणीचा प्रवास केला आहे. मुंबई शेअर बाजारात मिड कॅप २३ ऑगस्ट रोजी १२,९१४.६३ अंश या तर स्मॉल कॅपही त्याच दिवशी ११,९५०.८६ अंश या त्यांच्या ५२ आठवडय़ांच्या किमान स्तरावर होता.

मुंबई निर्देशांकाने या वर्षांत प्रथमच ४० हजार, तर निफ्टीने १२ हजारांचा स्तर गाठला. या वर्षांत, १९ फेब्रुवारी रोजी ३५,२८७.१६ हा तळ नोंदविणारा सेन्सेक्स २० डिसेंबर रोजी ४१,८०९.९६ या सर्वोच्च टप्प्यापर्यंत पोहोचला होता. एकाच व्यवहारातील तब्बल १,९२१ अंश उसळीची नोंद सेन्सेक्सने २० सप्टेंबर रोजी केली होती.

गेल्या वर्षांत, २०११ मध्ये सेन्सेक्समध्ये २,०११ अंश म्हणजेच ५.९ टक्के वाढ झाली होती. तर मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल ७.२५ लाख कोटींनी वाढून १४४.४८ लाख कोटींवर पोहोचले होते.

चालू वर्षांत प्रथमच, २८ नोव्हेंबर रोजी १०.०१ लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्य टप्पा गाठणाऱ्या रिलायन्सने एचडीएफसी, टीसीएस यांनाही याबाबत मागे टाकले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी या वर्षांत १४.४ अब्ज डॉलर समभागांमध्ये गुंतविले.

वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ११.०५ लाख कोटी रुपयांनी वाढून १५५.५३ लाख कोटी रुपये झाले. तर या वर्षांत १६ कंपन्यांच्या प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रियेतून १२,३६५ कोटी रुपये उभे राहिले.

२०२० साठी सेन्सेक्सचे ५०,००० चे लक्ष्य!

दुहेरी अंकवृद्धी नोंदविणारा सेन्सेक्स २०२० मध्ये ५०,००० अंशांचा टप्पा गाठेल, असा विश्वास दलाली पेढय़ांनी व्यक्त केला आहे. वर्ष २०१९ मध्ये ४०,००० ची मजल पार करणारा मुंबई निर्देशांक अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणुका, रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण, निर्मला सीतारामन यांच्याकडून तिसऱ्यांदा सादर होणारा अर्थसंकल्प या जोरावर नव्या वर्षांत ५०,००० वर जाईल; तर निफ्टी १४,००० चा स्तर ओलांडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:33 am

Web Title: sunsex nefity capital war for investors akp 94
Next Stories
1 मोठय़ा नागरी सहकारी बँकांना ‘व्यवस्थापन मंडळ’ नेमणे बंधनकारक
2 ‘५जी’ची चाचणी सर्वाकरिता – प्रसाद
3 ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ आणि गुंतवणूकदार
Just Now!
X