पाच दिवसात ‘सेन्सेक्स’ला १,५७७ अंशांचे खिंडार

मुंबई : सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक गुरुवारी सलग पाचव्या सत्रात घसरले. परिणामी भांडवली बाजाराची महिन्याची वायदापूर्ती अखेरही घसरणीनेच झाली.

गुरुवारच्या व्यवहारादरम्यान ४६५ अंशांहून अधिक प्रमाणात खाली येणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स सत्रअखेर मात्र काहीसा सावरत, १४३.३० अंश घसरणीसह ३९,७४५.६६ पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ४५.२० अंश घसरणीसह ११,६३३.३० वर दिवसअखेर थांबला.

मागील सलग पाच व्यवहारांतील घसरणीमुळे मुंबई निर्देशांक १,५७७.३४ अंशांनी खाली आला आहे. तर या दरम्यान निफ्टीत ४९२.६० अंशांची घसरण नोंदली गेली आहे.

गुरुवारच्या व्यवहारअखेर सेन्सेक्समधील ओएनजीसी सर्वाधिक, २.६१ अंशांनी घसरला. तर एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचेही मूल्य घसरले. सन फार्मा, टायटन कंपनी, अ‍ॅक्सिस बँक, एशियन पेंट्स हे समभाग मात्र जवळपास ४ टक्के मूल्यवाढीसह मुंबई निर्देशांकातील तेजीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, तेल व वायू, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, दूरसंचार, वाहन आदी २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर ग्राहकपयोगी वस्तू, आरोग्यनिगा निर्देशांक काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील मोठा उतार गुरुवारीही नोंदला गेला. तर येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र काही प्रमाणात भक्कम बनला.

भांडवली बाजाराचे चालू सप्ताहअखेरचे, शुक्रवारचे व्यवहार जाहीर होणाऱ्या तिसऱ्या तिमाहीच्या आर्थिक विकास दराच्या आकडेवारीसंबंधाने आशा-आकांक्षेवर होण्याची शक्यता आहे.

विदेशी वित्तसंस्थांकडून विक्रीचा सपाटा!

कोरोना विषाणूच्या जगभरातील उद्रेकाच्या धडकीने जगातील सर्वच प्रमुख बाजारपेठांना ग्रासले आहे. त्यामुळे जगभरातून समभाग विक्री दणक्यात सुरू असून, भारतातही स्थानिक बाजारातून विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडून काढता पाय घेतला जात आहे. सलग पाच दिवसांच्या बाजारातील पडझडीत त्यांच्याकडून विक्रीचा मोठे योगदान आहे. बुधवापर्यंतच्या तीन दिवसात विदेशी गुंतवणूकदारांनी ६,९०० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले आहेत.