सेन्सेक्ससह निफ्टीचा नकारात्मक प्रवास सुरू

मुंबई : भांडवली बाजाराची नव्या सप्ताहाची सुरुवातही घसरणीसहच कायम राहिली. सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना प्रमुख निर्देशांक जवळपास अध्र्या टक्क्य़ांपर्यंत खाली आले.

चीनमधील करोना विषाणू संसर्गाने बळींची संख्या वाढतच असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घडामोडीद्वारे दिसून येत असल्याने त्याचे सावट आता येथील भांडवली बाजारावरही दिसू लागले आहे. सेन्सेक्स १६२.२३ अंश घसरणीसह ४०,९७९.६२ वर तर निफ्टी ६६.८५ अंश घसरणीने १२,०३१.५० पर्यंत येऊन थांबला.

आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारा दरम्यान मुंबई निर्देशांक जवळपास ४०० अंशांनी उसळला होता. मात्र दिवसअखेर पुन्हा बाजारात गुंतवणूकदारांचा विक्री दबाव निर्माण झाला. परिणामी सेन्सेक्सही सत्रअखेर घसरणीतच कायम राहिला.

पोलाद, वाहन क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. हे दोन्ही निर्देशांक ३ टक्क्य़ांपर्यंत आपटले. त्याचबरोबर ऊर्जा, ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांकही घसरले.

मुंबई निर्देशांकात महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, ओएनजीसी, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प आदी घसरले. तर बजाज फायनान्स, टीसीएस, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी लिमिटेड, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रिज आदी मात्र वाढले.