19 November 2019

News Flash

‘सेन्सेक्स’चे  नवीन शिखर निफ्टी १२ हजार पार

सेन्सेक्समध्ये सन फार्मा वाढीव तिमाही नफ्याच्या जोरावर सर्वाधिक, ३ टक्क्यांपर्यंत वाढला.

मुंबई निर्देशांकात आणखी भर टाकत प्रमुख शेअर बाजाराने गुरुवारीही विक्रम नोंदविला. सेन्सेक्स आता ४०,६५० पुढे गेला आहे. तर जवळपास अर्धशतकी निर्देशांक वाढीने निफ्टीला अखेर त्याचा १२ हजारांपुढील स्तर गाठता आला.

अमेरिका-चीन व्यापार चर्चेचा वेग आणि भारतात स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीच्या निधीला परवानगी यामुळे येथील भांडवली बाजारातील चैतन्य सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. मुंबई निर्देशांकाने मंगळवारी प्रथमच ४०,५०० नजीकचा टप्पा गाठला होता. त्यात गुरुवारी आणखी १८३.९६ अंशांची भर पडून सेन्सेक्स ४०,६५३.७४ या नव्या स्तरावर विराजमान झाला.

व्यवहारात मुंबई निर्देशांक ४०,६८८.२७ पर्यंत झेपावला. तर १२,०१७ पर्यंत मजल मारणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक गुरुवारअखेर ४६ अंश वाढीसह १२,०१२.०५ वर स्थिरावला. निफ्टीने पाच महिन्यानंतर प्रथमच १२ हजारावरील स्तर अनुभवला आहे. यापूर्वी ४ जून रोजी निफ्टी निर्देशांक या अनोख्या टप्प्यावर होता.

अमेरिका-चीन व्यापार चर्चेला गती मिळत असतानाच येथील मंदीसदृश स्थितीतील स्थावर मालमत्ता क्षेत्राकरिता २५,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे जोरदार स्वागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात व्यवहार करताना केले. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांची दखलही बाजारात कायम आहे.

सेन्सेक्समध्ये सन फार्मा वाढीव तिमाही नफ्याच्या जोरावर सर्वाधिक, ३ टक्क्यांपर्यंत वाढला. त्याचबरोबर इंडसइंड बँक, रिलायन्स, आयटीसी, वेदांता, एशियन पेंट्स, एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिसही त्याच प्रमाणात वाढले. तर येस बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आदी ३.२७ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, ग्राहकपयोगी वस्तू, दूरसंचार, आरोग्यनिगा आदी ०.९६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर तेल व वायू, भांडवली वस्तू, वाहन निर्देशांक पाव टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.६९ टक्क्यांपर्यंत वाढले.

बांधकाम समभाग भक्कम

ल्ल  स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ठप्प १,६०० प्रकल्पातील ४.५८ लाख घरांच्या निर्मितीचा प्रश्न मार्गी लागल्याचे स्वागत क्षेत्रातील बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य ८ टक्क्यांपर्यंत उसळले. एकूण स्थावर मालमत्ता निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढला.

६ एनबीसीसी इंडिया               रु.४१.५५            +८.२०%

६ इंडियाबुल्स रिअल इस्टेट     रु.७०.०५      +४.९४%

६ फिनिक्स मिल्स                  रु.७१७.३०     +३.११%

६ शोभा लिमिटेड                     रु.४३९.७०     +१.५७%

First Published on November 8, 2019 1:16 am

Web Title: sunsex nefty akp 94 2
Just Now!
X