निर्देशांक वाढीचे सलग पाचवे सत्र

मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या ओघासह भांडवली बाजारातील तेजीची दौड गुरुवारीही सुरू राहिली आणि सेन्सेक्सने व्यवहारात, ४०,३९२ या सार्वकालिक उच्चांकालाही गवसणी घातली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स केवळ ७७ अंशांच्या कमाईसह ४०,१२९.०५ वर स्थिरावला असला तरी निर्देशांकाने सलग पाचव्या सत्रात साधलेली ही वाढ ठरली.

निफ्टी निर्देशांकानेही गुरुवारी सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदविली. बुधवारच्या तुलनेत ३३.३५ अंशांच्या कमाईसह हा निर्देशांक दिवसअखेर ११,८७७.४५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ०.१९ टक्के आणि ०.२८ टक्क्य़ांनी वधारले. गुरुवारी ऑक्टोबर महिन्याच्या वायदा व्यवहारांच्या सौदापूर्तीला, समारोपाच्या शेवटच्या तासाभराच्या व्यवहारात निर्देशांकाला अस्थिरतेने घेरलेले दिसून आले. परिणामी निर्देशांकांनी प्रारंभीच्या व्यवहारात मारलेली मुसंडी टिकवून ठेवता आली नाही.

कंपन्या आणि विशेषत: बँकांची अपेक्षेपेक्षा सरस राहिलेली तिमाही कामगिरी, विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीतील दमदार सहभाग आणि अर्थवृद्धीच्या दिशेने सरकारकडून आणखी काही पावले टाकली जाण्याची आशेने बळावलेल्या बाजार-भावनांमुळे समभाग खरेदीला जोर चढत चालला आहे.अमेरिकेतील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने चालू वर्षांत सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करून बाजारातील उत्साही चक्राला आणखीच गती मिळाली आहे.

फेडने तिसऱ्यांदा व्याजदर कपात करताना, यापुढे आणखी कपातीला वाव नसल्याचे संकेत दिले असतानाही, जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांच्या निर्देशांकात तेजी दिसून आली. या जागतिक सकारात्मकतेचा स्थानिक बाजाराच्या हालचालीवर चांगला प्रभाव गुरुवारी दिसून आला.

विदेशी वित्तसंस्थांच्या बाजारातील वाढलेल्या गुंतवणुकीने तेजीची दौड सुरू राखण्यात इंधनाचे काम केले आहे. रुपयाच्या मूल्यात सशक्तेसह, बाजार निर्देशांक त्यामुळे उच्चांकी पोहोचले आहेत. उभरत्या बाजारांबद्दलचा विदेशी गुंतवणूकदारांचा गेल्या काही महिन्यात दिसलेला नकारात्मक कल बदलत आहे हा एक मोठा दिलासाच आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी स्पष्ट केले.

आशियाई बाजारांमध्ये हाँगकाँग, सोल आणि टोक्यो या बाजारांचे निर्देशांक दमदार वधारताना दिसून आले. शाघांय निर्देशांक मात्र घसरणीत राहिला. युरोपीय बाजारातही काहीशा नकारात्मक स्तरावर प्रारंभीचे व्यवहार सुरू झाले.