|| सुधीर जोशी

मागील सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मूडीज्ने भारताच्या पतमानांकनात केलेल्या कपातीमुळे झालेली घसरण या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी रोखली गेली. चारच दिवस झालेल्या व्यवहारात बाजाराचा कल दोलायमान राहिला. सप्ताहअखेर सेन्सेक्समध्ये ३३ अंशांची किरकोळ साप्ताहिक वाढ, तर निफ्टीमध्ये १३ अंशांची घट झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दोन प्रमुख कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत त्यांनी केलेला अनुक्रमे ५० हजार आणि २३ हजार कोटींचा तोटा त्याचाच परिणाम आहे. सरकारी नियंत्रणाचा प्रभाव असणाऱ्या या क्षेत्रातील कंपन्यांपासून सामान्य गुंतवणूकदारांनी लांब राहिलेलेच चांगले. सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका निर्णयामुळे एस्सार स्टीलच्या लिलावामधून मिळालेल्या रकमेच्या वाटपाचा अधिकार बँकाना मिळाला आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे समभाग तेजीत आले. स्टेट बँकेचा एस्सार स्टीलच्या कर्जात मोठा वाटा आहे तसेच बँक आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसायातील चार टक्के हिस्सा विकण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे स्टेट बँकेचे समभाग मूल्य तेजाळले आहे.

ब्रिटानियाने खर्चावर नियंत्रण, करांतील बचत व आपल्या उच्च श्रेणीच्या उत्पादनांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करून दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात ७४ टक्के वाढ जाहीर केली आहे. बाजाराने निकालांचे स्वागत केले. फक्त २४ कोटी भांडवलावर दहा हजार कोटींहून जास्त उलाढाल करणाऱ्या व जवळपास कर्जमुक्त असणाऱ्या या कंपनीचे समभाग बाजाराच्या प्रत्येक घसरणीमध्ये खरेदी करण्यासारखे आहेत.

भारतातील मंदीचा परिणाम एआयए इंजिनीअरिंग च्या निकालात दिसून आला. मागील आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ६ टक्के घट झाली. जागतिक व्यापारातील अस्थिरतेमुळे (ब्रेग्झिट, अमेरिका-चीन व्यापार युद्ध) येत्या दोन तिमाहीत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही. कंपनीने एआयए इंजिनीअरिंगने नवीन करप्रणालीचा फायदा घेण्यासाठी आस्थगित करदेय धोरणात बदल केला आहे. आपल्या उत्पादनांचा खाण उद्योगातील बाजाराचा वाटा वाढविण्यात कंपनी यशस्वी झाल्याने जागतिक बाजारपेठेत तिच्यासाठी मूल्यवाढीची संधी उपलब्ध आहे. चालू वर्ष फारसे आशादायक नसेल. परंतु दीर्घकालीन वाढीसाठी कंपनीने पुढील दोन वर्षांत मोठय़ा भांडवली खर्चाचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या भावात खरेदी केल्यास पुढील वर्षभरात १० ते १२ टक्के नफा कमविण्याची संधी मिळू शकेल.

अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याचे अंदाज, औद्योगिक उत्पादनांच्या वाढीतील घसरण, किरकोळ महागाई विर्देशांकातील वाढ अशा नकारात्मक बाबी समोर येत असतानाही भारतीय बाजार त्यावर फारशी प्रतिकूल प्रतिक्रिया देत नाही. दुसऱ्या तिमाहीत बहुतांश कंपन्यांची विक्री घटली आहे. परंतु कंपन्यांच्या प्राप्तिकरांतील बचतीमुळे निव्वळ नफ्याचे आकडे चांगले दिसत आहेत. बँकांचे सहामाही निकालही आशादायी आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी व सध्या असलेली रोकड तरलता याचाही अनुकूल परिणाम बाजारावर होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या फेब्रुवारीपर्यंत अजूनही ४० दशांश टक्क्यांपर्यंत व्याजदर कपात होण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. त्यामुळे बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता कमी आहे.

sudhirjoshi23@gmail.com