News Flash

सेन्सेक्स ४१ हजारानजीक!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या येणाऱ्या आठवडय़ातील पतधोरणाबाबतची अपेक्षाही बाजारातील व्यवहारा दरम्यान व्यक्त झाली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई निर्देशांकाचा विक्रमी टप्पा; निफ्टीकडून १२ हजाराचा स्तर पार

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची अस्थिरता क्षणा-क्षणाला वाढत असताना देशाच्या आर्थिक राजधानीचे प्रमुख निदर्शक मानले जाणारे भांडवली बाजाराचे सेन्सेक्स व निफ्टी सोमवारी मात्र पहिल्यांदाच त्यांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच सत्रात ५२९.८२ अंश झेपेसह ४०,८८९.२३ वर प्रथमच पोहोचला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५९.३५ अंश वाढीसह १२,०७३.७५ पर्यंत उंचावला. भारतात, सरकारच्या निगुर्ंतवणूक धोरणाचे जोरदार स्वागत भांडवली बाजारात झाले. यामुळे सरकारच्या वित्तीय तुटीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये व्यक्त झाली.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या येणाऱ्या आठवडय़ातील पतधोरणाबाबतची अपेक्षाही बाजारातील व्यवहारा दरम्यान व्यक्त झाली. यामुळे सेन्सेक्स सत्रात ४०,९३१.७१ पर्यंत झेपावला. तर निफ्टी दिवसअखेरही १२ हजाराच्या वर कायम राहिला. प्रत्येकी सव्वा टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात झेपावणाऱ्या दोन्ही निर्देशांकातील सोमवारचा टप्पा त्यांच्या स्थापनेच्या इतिहासात प्रथमच गाठला. यापूर्वी निर्देशांकांनी चालूच महिन्यात नवे टप्पे गाठले होते. आठवडय़ाच्या पहिल्या सत्राची सुरुवातच तेजीसह करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात दूरसंचार क्षेत्रीय निर्देशांक सर्वाधिक, ७ टक्क्य़ांनी वाढला. या क्षेत्राला सरकारने शुल्काबाबत दिलेल्या दिलाशाचा हा परिणाम होता.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, टाटा स्टील, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, वेदांता आदी ७ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर ओएनजीसी, येस बँक हे दोनच समभाग घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई निर्देशांकातील एकूण ३० पैकी तब्बल २८ कंपनी समभाग तेजीच्या यादीत राहिले. तर मुंबई शेअर बाजारातील १,४१३ समभाग तेजीच्या व १,०८६ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या सावटातील घडामोडी स्थिरावत असल्याने पोलाद क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य सोमवारी ७ टक्क्य़ांपर्यंत उंचावले. या क्षेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर, टाटा स्टील, हिंदाल्को इंडस्ट्रिज, नाल्को आदी समभागमूल्य झेप नोंदविणाऱ्या कंपन्या ठरल्या. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील एनएमडीसी, वेदांता, सेल, हिंदुस्थान झिंक, कोल इंडियाही वाढले. विविध घटना-घडामोडींमुळे अनेक समभागांची मूल्य हालचाल आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात लक्षणीय ठरली.

यामध्ये मालमत्ता विक्रीच्या चर्चेमुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या समभागाने ६ टक्क्य़ांपर्यंतची उसळी नोंदविली. तर समूहामार्फत होणाऱ्या निधी उभारणीमुळे बाजारात सूचिबद्ध एडेलविस फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचा समभाग ५ टक्क्य़ांपर्यंत उसळला. यूनिकेम लॅबचा समभाग कंपनीच्या नव्या औषधाला अमेरिकी प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने १२ टक्क्य़ांपर्यंत वाढला.

गुंतवणूकदार १.८१ लाख कोटींनी श्रीमंत

सर्वोच्च टप्प्याला पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता सोमवारी १.८१ लाख कोटी रुपयांवर झेपावली. एकाच व्यवहारात तब्बल ५३० अंश उसळी घेणारा सेन्सेक्स सप्ताहारंभीच जवळपास ४१ हजारापर्यंत गेला आहे. परिणामी देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १,८१,९३०.८९ कोटी रुपयांनी वाढून १,५४,५५,७४०.६७ कोटी रुपये झाले.

सेन्सेक्समधील नवे समभाग तेजाळले

मुंबई निर्देशांकातील कंपन्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या बदलानंतरचे पहिले व्यवहारही सोमवारीच झाले. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांच्या सूचिमधून टाटा मोटर्स, येस बँक व वेदांता बाहेर पडले आहेत. परिणामी त्यांचे समभाग मूल्य सोमवारी घसरले. तर त्यांची जागा घेणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी व नेस्ले इंडियाचे समभाग मूल्य वाढले. त्यांच्यात प्रत्येकी एक टक्क्य़ांहून अधिक मूल्यवाढ नोंदली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:44 am

Web Title: sunsex nifty share market akp 94
Next Stories
1 सेन्सेक्सने गाठला आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर
2 ‘डीएचएफएल’च्या दिवाळखोरी प्रक्रियेला गती
3 कर्जबुडव्यांविरोधात ‘सेबी’चे कठोर पाऊल
Just Now!
X