रॉय यांचा पॅरोल वाढविताना न्यायालयाने सुनावले

अतिरिक्त ३०० कोटी रुपये भरून तुम्ही तुरुंगाबाहेर राहू शकता, असे सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाचे सुब्रता रॉय यांचा पॅरोल ६ सप्टेंबपर्यंत वाढविला. गुंतवणूकदारांचे २५,००० कोटी रुपये देण्यात असमर्थ ठरलेल्या रॉय यांना १०,००० कोटी रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.

आईचे निधन झाल्यानंतर रॉय यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय न्यायालयाने मेमध्ये घेतला होता. याबाबतची बुधवारी सुनावणी मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या त्रिसदस्यीय समितीसमोर झाली. या वेळी रॉय यांचे वकील कपिल सिब्बल यांनी रॉय यांच्या सुटकेसाठी महिन्याला २०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यावर ही रक्कम गृहीत धरली तर रॉय यांना तुरुंगाबाहेर पडण्यासाठी १० वर्षे लागतील, असे गणित न्यायालयाने मांडले. सहाराच्या विदेशातील तीन मालमत्ता कोणत्याही क्षणी विकले जाणार असून त्यातून रक्कम उभी राहणार असल्याचे रॉय यांच्या वकिलांनी सांगितले. अशा प्रकारे समूह येत्या १८ महिन्यांमध्ये पूर्ण रक्कम अदा करेल, असेही सिब्बल म्हणाले. त्यावर न्यायालयाने सहाराला १६ सप्टेंबपर्यंत ३०० कोटी रुपये अतिरिक्त देण्यास बजाविले व त्याबरोबर रॉय यांना तोपर्यंत पॅरोलवरही सोडण्याचा आदेश दिला. मार्च २०१४ पासून तुरुंगात असलेल्या रॉय यांना ६ मे रोजी पॅरोलवर सोडले.