जपानची कार निर्माता सुझूकी मोटर कॉर्पोरेशनने आपल्या छोटय़ा कारची इंधन कार्यक्षमता (माइलेज) हे वाजवीपेक्षा अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात आणल्याने निर्माण झालेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर, कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी त्यांच्याकडे असलेल्या मुख्याधिकारी (सीईओ) या पदापासून मुक्त होत असल्याचे बुधवारी घोषित केले. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ओसामू होंडा यांना निवृत्ती तर या प्रकरणाशी संबंधित कंपनीच्या संचालकांवर वेतन कपातीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे. सुझूकी मोटर कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत या नुकत्याच उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणाचे दोषारोप आणि शिक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारचे घोटाळे घडणार नाहीत यासाठी खबरदारीची ग्वाही देणारे आणि ग्राहकांकडे दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन कंपनीने प्रसिद्धीस दिले.