माझ्या कामाचे स्वरूप हे माझ्या कार्याकायीन सहकाऱ्यांना मार्गदर्शनाचे असते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरून उमटणाऱ्या हावभावावरून माझे म्हणणे त्यांना कितपत पटले आहे हे कळते.

प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि संगणकाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेले भाव यातील फरक मला टाळेबंदीने शिकवला.

टाळेबंदीने नंतरच्या तिसऱ्या आठवडय़ात ही माझा कार्यालयीन सहकारी माझ्याशी कितपत सहमत आहे हे संगणकच्या पडद्यावरील त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळत नाही. टाळेबंदीने मला तंत्रज्ञान वापराचे फायदे शिकवले.

मी संध्याकाळी कार्यालयीन काम संपल्यावर विचार करतो तेव्हा हाच प्रसंग पाच वर्षांपूर्वी आला असता तर काय परिस्थिती झाली असती हा विचार करवतसुद्धा नाही. प्रसंगी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत आमचे कामकाज सुरळीत सुरू आहे ते केवळ तंत्रज्ञांनाच्या वापरामुळे.

टाळेबंदीच्या या कालावधीत आमच्या घरात एक जागा कार्यालयीन कामकाजासाठी निश्चित केली आहे. दिवसभर म्हणजे कार्यालयीन वेळेत माझे कुटुंबीय शक्यतो माझ्या कार्यालयीन कामकाजात व्यत्यय न येऊ  देण्याचा प्रयत्न करतात. मला असे वाटत नाही की, टाळेबंदीनंतर मी पुन्हा मी कार्यालयात जाऊ लागेल तेव्हा माझ्या मानसिकतेत खूप बदल झाला असेल.

आम्ही कार्यालयात नसलो तरीदेखील आमचे काम सुरळीत सुरू आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी अशा वाटते.

कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत चहा पिण्याची मजा वेगळीच असते. सकाळी घरी चहा घेतला तरी कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबरच्या चहाचा स्वाद निराळाच.

मला संगीत ऐकायला आवडते. नेहमीच्या दिवशी कार्यालयातून घरी आल्यावर मी नियमाने संगीत ऐकतो. टाळेबंदीमुळे उलट मला संगीताचा आस्वाद घेता येत नाही याची खंत वाटते!

गुंतवणूकविषयी..

आपणच आपल्या गरजा वाढवत असतो हा धडा मला टाळेबंदीने शिकवला, असे म्हटले वावगे ठरणार नाही. टाळेबंदीच्या मर्यादांमुळे अनेक गोष्टींच्या वापरात बंधने आली आहेत. ज्या गोष्टी टाळेबंदीपूर्वी आत्यंतिक गरजेच्या वाटत होत्या त्या गोष्टींशिवाय जगताना आपण त्यांना मुकलो, असे वाटत नाही. म्हणजे अशा गोष्टींचा उपभोग गरज नसताना आपण घेत होतो ही टाळेबंदीची मोठी शिकवण आहे.