महाराष्ट्रातील सॅण्डोज प्रकल्प रडारवर
सॅण्डोज या नावाने उत्पादन घेत असलेल्या मूळच्या स्विस कंपनी नोवार्टिस या औषध कंपनीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दर्जाबाबत निर्वाणीचा इशारा दिला आहे. कंपनीच्या महाराष्ट्रातील दोन प्रकल्पांसाठी याबाबतचे पत्र मिळाले असून, कारवाईची पावले उचलण्यात येतील, असे नोवार्टिसने स्पष्ट केले आहे.
अमेरिकी औषध नियामकाने यापूर्वी असाच इशारा डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजलाही दिला होता. कंपनीच्या भारतातील तीन प्रकल्पांबाबत औषध दर्जाबाबत सावध करण्यात आले होते. असेच पत्र नोवार्टिसच्या महाराष्ट्रातील तुर्भे (नवी मुंबई) व कळवा (ठाणे) येथील औषध प्रकल्पाबाबतही प्राप्त झाले आहे.
इशाऱ्याबाबतचे पत्र मिळाल्याचे मान्य करत नोवार्टिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष रणजित शाहनी यांनी याबाबत कारवाईची पावले उचलण्यात येत असून कंपनी लवकरच पूर्वपदावर येईल, असे स्पष्ट केले. कंपनीच्या या दोन प्रकल्पांत सॅण्डोज नाममुद्रेंतर्गतची औषधे तयार करण्यात येतात.
अमेरिकेच्या औषध नियामकाने कंपनीच्या प्रकल्पांची तपासणी ऑगस्ट २०१४ मध्ये केली होती. यानंतर २२ ऑक्टोबर रोजी नियामकाने कंपनीला दर्जा सुधारण्याबाबत इशारा देणारे पत्र पाठविले. सॅण्डोज सिरप व गोळ्यांचा दर्जा सुधारण्याबरोबरच औषधनिर्मिती दरम्यान गुणवत्ता राखण्याबाबत कंपनीला सावध करण्यात आले आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. प्रसाद यांनी अमेरिकेच्या औषध नियामकाचे औषध गुणवत्तेबाबतचे पत्र कंपनीला मिळाल्याचे या महिन्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी सौमेन चक्रबर्ती यांनीही, अमेरिकेतील औषध नियामकाद्वारे कंपनीच्या तीन प्रकल्पांचे पुनर्लेखापरीक्षण केल्यानंतर औषधांचा दर्जा सुधारलेला आढळून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम व दुव्वडा (विशाखापट्टणम) तसेच तेलंगणामधील मिरयालागुडा येथे औषध उत्पादन प्रकल्प आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या औषधांमध्ये नियमनाचे पालन न झाल्याबाबतचे पत्र अमेरिकी औषध नियामकाने कंपनीला पाठविले होते. कंपनीवर यापूर्वी नोव्हेंबर २०१४ तसेच जानेवारी व फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या कारवाईचाच हा भाग असल्याचे मानले जाते.