गेल्या पाच वर्षांपासूनचा तीन कोटी रुपयांचा सेवा कर थकविल्यापोटी तळवलकर्स फिटनेस सोल्युशन कंपनीचे संचालक रोहित तळवलकर यांना बुधवारी अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर २९ जानेवारीपर्यंत न्यायिक कोठडी सुनावण्यात आली.
१९३२ पासून आरोग्य आणि शरीरसौष्ठव सेवा क्षेत्रात कार्यरत तळवलकर्सची मुंबई, नाशिकसह १२ शहरांमध्ये जिम केंद्रे आहेत. तळवलर्स फिटनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालविण्यात येणाऱ्या या केंद्रांशी अनेक सिने तारे-तारिका संबंधित आहेत.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडने या प्रकरणाशी तसेच रोहित तळवलकर यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबर २००७ ते डिसेंबर २०१२ दरम्यान सेवा कर न भरणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने ५० टक्के रक्कम भरण्याची सवलत दिली होती. ३१ डिसेंबर २०१३ नंतर संपलेल्या या सूटनंतर अटकेसारख्या कारवाईचा इशाराही या मोहिमेद्वारे (व्हीसीईएस) दिला जात होता. यामार्फत आतापर्यत ७,७०० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.