कर्जतनजीकच्या गाजलेल्या ‘टीएमसी’ अर्थात तानाजी मालुसरे सिटी प्रकल्पात सहा वर्षांपूर्वी केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार असून भागधारकांच्या ुवादात अडकलेल्या ३,६०० जणांच्या निवाऱ्याचा प्रश्न नव्या कंपनीच्या पुढाकाराने सुटणे अपेक्षित आहे.

‘टीएमसीवर ‘ब्रिक ईगल’ने ताबा मिळविला असून त्याचे पुन्हा एकदा आरेखन होणार आहे. नव्या कंपनीने एप्रिलपासूनच घरांचे व्यवहार सुरू करण्याचे ठरविले असून याअंतर्गत ५०० माफक दरातील घरे उपलब्ध केली जाणार आहेत.
माफक दरातील गृहनिर्माण प्रकल्प म्हणून हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी खूपच लोकप्रिय झाला. मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या १०५ एकरांवरील संकुलात २० हजार घरे असे प्रकल्पाचे आरेखन प्रसिद्ध वास्तुरचनाकार हफीज काँट्रॅक्टर नव्याने करणार आहेत. परिसरातीलच एक्सर्बिया निवासी प्रकल्पासाठीही त्यांनीच आरेखन केले आहे.
भागधारकांमधील मतभेद आणि प्रशासकीय पातळीवरील वादांमुळे हा प्रकल्प गेली पाच वर्षे रखडला होता. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘ब्रिक ईगल्स’ने या प्रकल्पाच्या अधिग्रहणाला प्रारंभ केला. ‘टीएमसी’ हे निवासी शहर ‘ब्रिक ईगल इन्क्युबेटेड’ची विकासक कंपनी असलेल्या ‘शेल्ट्रेक्स डेव्हलपर्स’कडून विकसित केले जाईल. पहिल्या टप्प्यात ५०० घरे पूर्ण होणार असून येत्या एप्रिलपासून घरांची विक्री सुरू केली जाईल.