लवकरच येऊ घातलेल्या स्वस्तातील हवाई प्रवास सेवेसाठी एअरआशिया इंडियाने मंगळवारी केंद्रीय नागरी हवाई खात्याला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला. कंपनीतील मुख्य प्रवर्तक टोनी फर्नाडिस, रतन टाटा यांनी खुद्द केंद्रीय मंत्री अजितसिंह यांच्या राजधानीतील निवासस्थानी भेटून त्यांना या प्रमाणपत्राची मागणी केली. त्यांच्याबरोबर यावेळी झालेल्या अध्र्या तासाच्या चर्चेत कंपनीचे उपाध्यक्ष कमरुद्दीन मेरानून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य हेही सहभागी झाले होते. एअरएशिया इंडियाने यावेळी कंपनीतील नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही माहिती दिली; केंद्रीय गृहखात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर कंपनी उड्डाणासाठी नागरी हवाई महासंचालकांची मंजुरी मिळवू शकेल, असे सिंह यांनी सांगितले. एअरआशियाची मुख्य प्रवर्तक मलेशियातील एअरआशिया एअरलाईन्सचे अध्यक्ष टोनी फर्नाडिस हे सध्या व्यवसाय प्रारंभाच्या तयारीसाठी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भारतातील नव्या हवाई कंपनीत टाटा समूहाचा ३० टक्के हिस्सा आहे.