वाहनांच्या आतील बैठक व्यवस्था बनवण्यासाठी ‘टाटा ऑटोकाँप’ आणि ‘मॅग्ना इंटरनॅशनल’ या कंपन्या एकत्र आल्या आहेत. या ‘जॉइंट व्हेंचर’मध्ये दोन्ही कंपन्यांचा प्रत्येकी ५० टक्के वाटा असून वाहनांच्या आणि बसच्या आतील बैठक व्यवस्थेचे उत्पादन या कंपन्या करतील. ‘‘व्यावसायिक वाहनांमध्ये नावीन्यपूर्ण बैठक व्यवस्थेचा वापर अजून देशात सुरू झालेला नाही. पायाभूत सुविधांच्या विस्ताराबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवासाची सुविधा देणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत आहे. अशा वाहनांमध्ये बसणे चालक आणि प्रवाशांसाठी आरामदायक असायला हवे. त्यामुळे वाहन उद्योगाला नावीन्यपूर्ण बैठक व्यवस्थेच्या पुरवठय़ाची आवश्यकता आहे,’’ असे मत ‘टाटा ऑटोकाँप’च्या ‘ऑपरेशन्स अँड न्यू टेक्नॉलॉजी’ विभागाचे प्रमुख अरविंद गोयल यांनी व्यक्त केले.या ‘जॉइंट व्हेंचर’चे प्रमुख कार्यालय पुण्यात असून देशभरातील ग्राहकांना येथून पुरवठा करण्यात येईल. ‘वाहनांच्या आतील बैठक व्यवस्थेच्या उत्पादनात ‘मॅग्ना’चा अनुभव आणि ‘टाटा ऑटोकाँप’ला असलेले भारतातील बाजारपेठेचे ज्ञान याचा उपयोग जॉइंट व्हेंचरला होईल,’ अशी आशा ‘मॅग्ना सिटिंग’चे अध्यक्ष माईक बायसन यांनी व्यक्त केली.