फ्लेवर इट, आय-शक्ती, स्वच्छ अशी उत्पादने सादर करून गेल्या काही कालावधीत चांगला प्रतिसाद मिळालेल्या टाटा केमिकल्सने आगामी कालावधीतही ग्राहकोपयोगी वस्तू निर्मितीवर अधिक भर देण्याचा मनोदय कंपनीच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्ताने व्यक्त केला आहे. जीवनाशी निगडित उत्पादनांवर कंपनी अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, असा मनोदयही या निमित्ताने व्यक्त केला गेला.
अ‍ॅश सोडा आणि मीठ निर्मितीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या टाटा केमिकल्सची उभारणी समूहाचे जे. आर. डी. टाटा यांनी कपिल राम वकील यांची ओखामंडल स्टार वर्क्‍स ताब्यात घेत केली. १०० अब्ज डॉलरच्या टाटा समूहातील टाटा केमिकल्सची स्थापना २३ जानेवारी १९३९ मध्ये गुजरातच्या मिठापूर येथे करण्यात आली. कंपनीची उलाढाल आजमितीस १३,८०० कोटी रुपयांची झाली आहे.
कंपनीने येत्या पाच ते सात वर्षांत अधिक विस्ताराचे व मोठय़ा गुंतवणुकीचे उद्दिष्टही राखले आहे. या अंतर्गत अमेरिकेत उत्पादननिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासह कंपनीवरील कर्ज नजीकच्या वर्षांमध्ये निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.