आयटीक्षेत्रावरील मळभ दूर..

‘ब्रेग्झिट’, ‘ट्रम्प’ सत्तांतर अशा विपरीत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारतातील माहिती तंत्रज्ञानावर २०१६ मध्ये मळभ निर्माण झाल्याचे चित्र टीसीएसने खोटे ठरविले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा समूहातील या कंपनीने १०.९ टक्के नफा, तर ८.७ टक्के महसूल वाढ नोंदविली आहे.

देशातील सर्वात मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ मध्ये वार्षिक तुलनेत १०.९ टक्के अधिक, ६,७७८ कोटी रुपये नफा कमाविला आहे. तर महसुलात ८.७ टक्के वाढ होऊन तो २९,७३५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेतही नफ्यातील २.९ व महसुलातील १.५ टक्के वाढ राखली आहे.

तिमाही निष्कर्ष कालावधीत युरोपातील ब्रेक्झिट व अध्यक्ष ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेत सत्तांतर या प्रमुख घडामोडी घडल्या. याच दरम्यान खनिज तेल दराने पुन्हा एकदा वाढ नोंदविली. तर डॉलरचे भक्कम होणे आदीही आंतरराष्ट्रीय प्रमुख घटना नोंदविल्या.

या साऱ्यांचा भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होण्याची भीती २०१६ च्या अखेरच्या टप्प्यात व्यक्त केली जात होती. टीसीएसच्या आश्वासक निकालांतून मात्र ती फोल ठरली. येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना भारताबाहेरून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे.

व्यवसाय आराखडा आणि परिचलन धोरणात काहीसे लवचीक धोरण अंगीकारल्याने कंपनीला यंदाच्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी करता आली, असा दावा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांनी केला. एरवी संथ प्रतिसाद देणाऱ्या या तिमाहीत डिजिटल, क्लाऊड व्यवसाय धर्तीवर कंपनी बलवान असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

१० अब्ज डॉलरच्या टीसीएसला या तिमाहीत १ अब्ज डॉलर रोखीचा ओघही नोंदविता आला आहे. कंपनीने प्रति समभाग ६.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. टीसीएसची प्रति समभाग मिळकत सध्या ३४.४० रुपये आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीने १८,३६२ नवे कर्मचारी जोडले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याची भीती असताना कंपनीची एकूण कर्मचारी संख्या डिसेंबर २०१६ अखेर ३,७८,४९७ झाली आहे. कंपनीच्या कर्मचारी गळतीचे प्रमाण यंदा १२.२ टक्क्यांवरून ११.३ टक्क्यांपर्यंत आले आहे. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक, ३४.६ टक्के राहिले आहे.

अमेरिकेमार्फत एच१-बी व्हिसाधारकांच्या संख्येवर येऊ घातलेली मर्यादा, वाढीव व्हिसा शुल्क आदी आव्हानांचा सामना करण्यासाठी कंपनीला व्यवसाय आराखडय़ात अधिक बदल करावा लागेल. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासात नौका तरून जायची असेल तर  शिडाचा पडदा फिरवावाच लागतो!  – एन. चंद्रशेखरन, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीसीएस

 

राजेश गोपीनाथन यांच्याकडे टीसीएसची धुरा

एन. चंद्रशेखरन यांच्या टाटा सन्सच्या अध्यक्षपद नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या टीसीएसच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजेश गोपीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोपीनाथन हे टीसीएसमध्ये २००१ पासून आहेत. फेब्रुवारी २०१३ मध्ये ते माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी बनले. त्याचबरोबर कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य परिचलन अधिकारी म्हणून एन. गणपती सुब्रमण्यम यांचे नाव निश्चत केले आहे.

untitled-21