16 January 2019

News Flash

‘टीसीएस’कडून भागधारकांना खुशखबर!

शुक्रवारच्या बैठकीत ‘बायबॅक’चा निर्णय अपेक्षित

शुक्रवारच्या बैठकीत बायबॅकचा निर्णय अपेक्षित

सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने येत्या शुक्रवारी (१५ जून) नियोजित संचालक मंडळाच्या बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा (बायबॅक) प्रस्ताव विचारात घेण्याचे निश्चित केले आहे. कंपनीने या बैठकीसंबंधी मुंबई शेअर बाजाराला मंगळवारी सायंकाळी दिलेल्या सूचनेतून हा संकेत मिळत आहे. कंपनीकडील रोकड गंगाजळीचा भागधारकांना लाभ देण्याचा संकेत बुधवारी बाजारात समभागाच्या मागणी आणि मूल्यवाढीस कारणीभूत ठरला.

शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव विचारात घेतला जाणार, हे जरी कंपनीने सांगितले असले तरी, त्या संबंधाने अन्य काही तपशील मात्र दिलेला नाही. टीसीएसकडे उपलब्ध असलेली मोठी राखीव गंगाजळी पाहता, किमान १०,००० कोटी रुपये समभाग फेरखरेदीसाठी खर्च केले जातील, असे कयास केले जात आहेत. समभाग पुनर्खरेदीने कंपनीच्या प्रति समभाग मिळकतीत (ईपीएस) मध्ये सुधारणा होण्यासह, जे अस्थिर आणि मलूल बाजारस्थितीत समभागाचे मूल्य तरतरीत राखण्यास मदतकारक ठरते. शिवाय भागधारकांना त्यांच्या हाती असलेल्या समभागांवर भरभरून लाभ देऊन खूश करण्याचा हा नवीन रुळत असलेला प्रघात आहे. टीसीएसकडून सलग दुसऱ्या वर्षी येऊ घातलेली ही भाग पुनर्खरेदी असून, नियमित लाभांश प्राप्तीपेक्षा भागधारकांना अधिक रकमेचा लाभ दिला जाण्यासह, कंपनीलाही लाभांश वितरण करातून मुक्तता मिळते.

टीसीएसचे नवनियुक्त मुख्याधिकारी राजेश गोपीनाथन यांनी चौथ्या तिमाहीची कामगिरी जाहीर करताना, कंपनीकडे उपलब्ध तरल रोख ही १०० टक्के भागधारकांना सुपूर्द करण्याचे आपला मानस स्पष्ट केला आहे. गत संपूर्ण आर्थिक वर्षांत टीसीएसची कार्यनिष्पादित तरल रोकड ही सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

भरभरून लाभ

टीसीएसने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये भागधारकांना समभाग पुनर्खरेदी आणि लाभांश या माध्यमातून एकूण २६,८०० कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. गेल्या वर्षी प्रति समभाग २,८५० रुपये किमतीने टीसीएसने भागधारकांकडील ५.६१ कोटी म्हणजे १६,००० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. शिवाय नुकताच १:१ प्रमाणात बक्षीस समभागही दिला आहे. भागधारकांना खूश करण्याच्या टीसीएसच्या आक्रमक पावलांचा दबाव, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्यांवरही दिसून येतो. अनेक कंपन्यांनी टीसीएसच्या पावलांचे अनुसरण केले आहे. विप्रोने सलग दोनदा समभाग पुनर्खरेदी केली, तर इन्फोसिस (१३,००० कोटी रु.) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (३,५०० कोटी रु.) गेल्या वर्षी समभाग पुनर्खरेदी योजना राबविल्या आहेत. एम्फॅसिस, हेक्झावेअर, माइंड ट्री या तुलनेने छोटय़ा कंपन्याही यात ओढल्या गेल्या आहेत.

भागधारकांना पुरेपूर परतफेडीची टीसीएस व्यवस्थापनाची कायम भूमिका राहिली आहे. त्यानुसार कंपनीकडे उपलब्ध तरल रोख ८० ते १०० टक्के प्रमाणात भागधारकांमध्ये वितरीत करण्याचे धोरण राहील.     राजेश गोपीनाथन, मुख्याधिकारी टीसीएस

मोन्सॅन्टोच्या भागधारकांपुढे बायरचा प्रत्येक समभाग २,९२६.८७ रुपयांनी खरेदीचा प्रस्ताव

कृषी रसायने आणि औषधी क्षेत्रातील जर्मनीत मुख्यालय असलेल्या बायर या अग्रणी जागतिक समूहाने मोन्सॅन्टो इंडियामधील अतिरिक्त २६ टक्के भागभांडवलाची १,३०० कोटी रुपये मोबदल्यात खरेदीसाठी खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) भारतातील भागधारकांपुढे ठेवला आहे. बायर समूहाने जागतिक स्तरावर मोन्सॅन्टोच्या संपादनासाठी तब्बल ६३ अब्ज डॉलरची किंमत चुकविण्याचा करार आधीच केला आहे. बायर एजीची भारतातील उपकंपनी बायर क्रॉपसायन्सने मोन्सॅन्टो इंडियाच्या ४४,८८,३१५ समभागांची (एकूण २६ टक्के भागभांडवल) सामान्य भागधारकांकडून खरेदीचा मानस ठेवला आहे. त्यासाठी प्रति समभाग २,९२६.८७ रुपये किमतीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. मोन्सॅन्टो इंडियाचा समभाग बुधवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा ०.४६ टक्के वाढीसह २,८६८.९० रुपये पातळीवर स्थिरावर होता. येत्या २७ जुलैपासून ते ९ ऑगस्टपर्यंत ही समभाग खरेदीची प्रक्रिया बायरकडून राबविली जाणार आहे.

First Published on June 14, 2018 1:27 am

Web Title: tata consultancy services 2