आदरातिथ्य व्यवसायाची पुनर्बाधणी टाटा समूहाने केली असून विवांता आणि गेटवे हॉटेल आता ताज हॉटेलच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. समूहातील इंडियन हॉटेल्स कंपनीद्वारे गेल्या दशकभरापासून महागडय़ा दरातील आदरातिथ्य सेवा या नाममुद्रेंतर्गत पुरविली जात आहे.
आदरातिथ्य क्षेत्रातील ताज हॉटेलसह विविध नाममुद्रा असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या विदेशातील मालमत्ता खरेदीबाबत टाटा सन्सचे निष्कासित अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी आक्षेप नोंदविला होता. सोमवारी मिस्त्री यांना संचालक म्हणून राहू न देण्यासाठी भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर समूहाने लगेचच इंडियन हॉटेलची पुनर्बाधणी केली.
याबाबतची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश सरना यांनी गुरुवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. यानुसार विवांता (पूर्वाश्रमीचे ताज प्रेसिडेंट) व गेटवे हॉटेल या नाममुद्रा आता ताज हॉटेल अंतर्गत असतील. भारतात तसेच विदेशांमध्ये ५३ महागडी हॉटेलची साखळी या दोन्ही नाममुद्रेंतर्गत आहे. इंडियन हॉटेल्सने ताज हॉटेल्स, पॅलेसेल, रिसॉर्ट्स आणि सफारीज अशा जागा व दरांनुसार चार श्रेणी यामध्ये केल्या आहेत.
सप्टेंबर २०१६ मध्ये स्टारवूड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स व मॅरिएट इंटिरनॅशनल यांच्या विलीनीकरणानंतर ताज हॉटेल्सचा देशातील सर्वाधिक खोल्या असणाऱ्या हॉटेलचा मान संपुष्टात आला होता.
इंडियन हॉटेल्सच्या ताफ्यात आता १३,५०५ खोल्यांच्या १०१ आदरातिथ्य मालमत्ता आहेत. कंपनीवर आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतूने इंडियन हॉटेल्सने गेल्या वर्षी तिची ताज बोस्टन ही मालमत्ता ८५० कोटी रुपयांना अमेरिकास्थित गुंतवणूकदाराला विकली. परिणामी, कंपनीला डिसेंबर २०१६ अखेरच्या तिमाहीत १३ कोटींवरून ९३ कोटी रुपयांपर्यंतचा नफा नोंदविता आला.
इंडियन हॉटेलमार्फत विदेशातील मालमत्ता भाडेतत्त्वावर घेताना समूहावर आर्थिक भार पडत असल्याची तक्रार हकालपट्टीनंतर मिस्त्री यांनी केली होती.