देशातील एकमेव सरकारी नागरी हवाई कंपनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाने रस दाखविल्याचे समजते. यासाठी इच्छुकांच्या स्पर्धेत एअर इंडियाची मूळ संस्थापक टाटा कंपनीही आहे.

टाटा समूहाद्वारे एअर इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर तिचे राष्ट्रीयीकरण झाले व टाटा समूह त्यातून बाहेर पडला. समूहाने एअर इंडियात स्वारस्य दाखविल्याची जोरदार चर्चा आहे.

एअर इंडियातील हिस्सा खरेदीसाठी सोमवारी बोली लावण्याचा अखेरचा दिवस होता. त्यासाठी अनेकांनी बोली दाखल केल्याचे केंद्रीय गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दिपम) सचिव तुहिन कांता यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले. तर टाटा समूहामार्फत मात्र अद्याप त्याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

बीपीसीएलचा दावेदार आज कळणार

भारत पेट्रोलियमच्या यशस्वी दावेदाराचे नाव मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. कंपनीतील निम्म्याहून अधिक हिस्सा खरेदीसाठी वेदांता, अपोलो ग्लोबर व स्क्वेअर्ड कॅपिटल या कंपन्यांनी बोली लावली आहे.