News Flash

टाटा समूहाची ‘बिगबास्केट’वर मालकी

स्पर्धा आयोगाकडून मान्यता

(संग्रहित छायाचित्र)

वाणसामानांच्या ऑनलाइन मोबाईल-अ‍ॅप आधारित व्यापाराच्या क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेच्या दिशेने टाटा समूहाचे गुरुवारी पुढचे पाऊल पडले. अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड समर्थित ‘बिगबास्केट’ या ऑनलाइन किराणा विक्रेता व्यासपीठीच्या टाटा सन्सच्या संपादन व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली.

या व्यवहारात, टाटा डिजिटल लिमिटेडकडून, बिगबास्केटची प्रवर्तक सुपरमार्केट ग्रोसरी सप्लाइज प्रा. लि.चे ६४.३ टक्के भागभांडवल ताब्यात घेतले जाईल. तसेच  इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रा. लिमिटेडवरही आता टाटा डिजिटलचे नियंत्रण येणार आहे. टाटा डिजिटल ही टाटा सन्सची १०० टक्के मालकी असलेली उपकंपनी असून, ती लॉयल्टी प्रोग्राम, ऑफर्स आणि देयक व्यवहाराशी संबंधित तंत्रज्ञान सेवा प्रदान करते.

भारतातील २५ बड्या शहरांमध्ये कार्यरत आणि वितरण सेवा असणारी बिगबास्केटची स्थापना २०११ साली झाली आहे. टाटा डिजिटल किंवा बिगबास्केट यापैकी कोणाकडून या व्यवहारामागील आर्थिक बाबी अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत.

टाटांच्या प्रवेशाने चुरस… 

एका अंदाजाप्रमाणे भारतात आजही ९५ टक्के किराणा वस्तूंची खरेदी ही पारंपरिक वाणसामानाच्या दुकानातूनच होते. तथापि सलग दुसऱ्या वर्षातील करोना टाळेबंदीच्या अनुभवाने, ग्राहकांचा ऑनलाइन किराणा खरेदीकडे कल वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत ही ऑनलाइन किराणा पेठेची व्याप्ती १,८०० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे.

सॉफ्टबँकचे पाठबळ असलेल्या ग्रोफर्स, अ‍ॅमेझॉन इंडिया त्याचप्रमाणे फ्लिफकार्ट, जिओ मार्ट यांनी व्यापलेल्या या बाजारवर्गात आता टाटा समर्थित बिगबास्केट कडवी स्पर्धक बनून उभी ठाकेल. शिवाय, टाटांकडून लवकरच ई-औषध विक्रेत्या ‘१एमजी’च्या अधिग्रहणासाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:37 am

Web Title: tata group owns bigbasket abn 97
Next Stories
1 अन्नधान्य, इंधन महागाईचा लवकरच भडका
2 आंतरराष्ट्रीय आस्थापनांचाही भारताला सहकार्यओघ
3 सेन्सेक्स, निफ्टीत पुन्हा भर
Just Now!
X