’३.२० लाख किमतीसह टियागोची धडक ’ नव्या मुख्याधिकाऱ्यांचा धोरणस्पर्श

प्रवासी वाहन क्षेत्रात सलग काही महिन्यांपासून निराशाजनक कामगिरी करणारी टाटा मोटर्स तिच्या नव्या टियागोसह हॅचबॅक श्रेणीतील स्पर्धेकरिता सज्ज झाली आहे. टियागो मध्यम गटातील स्पर्धकांच्या तुलनेत अधिक स्वस्तात उपलब्ध करतानाच कंपनीचे नवीन मुख्याधिकारी गुंटर बट्सचेक यांच्या व्यवसाय धोरणांचीही यानिमित्ताने  कसोटी लागणार आहे.

टाटा मोटर्सने ‘झिका’ या नावाने दोन महिन्यांपूर्वी हे हॅचबॅक श्रेणीतील वाहन तयार केले होते. ग्रेटर नोएडा येथे फेब्रुवारीत झालेल्या वाहन प्रदर्शनातही ते सादर करण्यात आले होते. मात्र अमेरिकेतील विषाणूसंसर्गाशी साधम्र्य राखणारे हे नाव कंपनीला बदलणे भाग पडले. बरोबरीने कारचे बाजारपेठेतील आगमनही लांबणीवर पडले.

५५ वर्षीय गुंटर हे दीड महिन्यांपूर्वीच एअरबसमधून टाटा मोटर्समध्ये रुजू झाले. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान झाल्यानंतर आधीच्या झिकामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येऊन नवी टियागो तयार करण्यात आली. वाहनातील इंजिन ते अंतर्गत रचना, तंत्रज्ञान हे अद्ययावत करण्यात आले आहे. शिवाय त्याचे बाह्य़रूपही अधिक आकर्षित करण्यात आले आहे.

पाच गटांतील व सहा रंगांतील टियागो ही या श्रेणीतील स्पर्धक मारुती सुझुकीच्या सेलेरिओ तसेच ह्य़ुंदाईच्या आय १० वाहनांच्या तुलनेत ५०,००० ते ८०,००० रुपयांनी स्वस्त आहे. १.२ लिटर पेट्रोल इंजिनमधील व १.०५ लिटर डिझेल इंजिनावरील टियागोची किंमत अनुक्रमे ३.२० ते ३.९४ लाख रुपयांच्या पुढे आहे. या गटात अन्य स्पर्धकांच्या ब्राओ (होन्डा), बिट (शेव्हर्ले) आदी कार आहेत.

टाटा मोटर्सने सादर केलेल्या नव्या वाहनाची श्रेणी गेल्या काही महिन्यांपासून दुहेरी आकडय़ातील विक्री वाढ नोंदवीत असल्याचे कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे प्रमुख (उत्पादन विपणन) रवींद्र जैन यांनी सांगितले. टियागोकरिता कंपनीने संशोधन, विक्री विभागातील मनुष्यबळावरही (कौशल्य हेतू) भर दिल्याचे कंपनीच्या प्रवासी कार विभागाचे (कार्यक्रम नियोजन व प्रकल्प व्यवस्थापन) वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी सांगितले.

टियागोची इंधन क्षमता २३.८४ ते २७.२८ किलोमीटर प्रति लिटर आहे. कंपनीने स्वत: विकसित केलेले रिव्होट्रॉन १,१९९ सीसी इंजिन यात आहे.

टियागोची विक्री कंपनीच्या देशभरातील ५९७ दालनांमधून गुरुवारपासून (गुढीपाडव्याच्या पूर्वदिनापासून) सुरू होत आहे. टियागो ही टाटा मोटर्सच्या साणंद (गुजरात) प्रकल्पात तयार होत असून येथे नॅनोनंतर तयार होणारे हे दुसरे मॉडेल आहे.