भारतासह चीनमधूनही वाहनांना कमी मागणीचा फटका

मुंबई : बाजारपेठेत नसलेल्या मागणीचा टाटा मोटर्सच्या ताळेबंदाला मोठा फटका बसला आहे. टाटा समूहातील वाहन निर्मात्या कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत आजवरचे सर्वाधिक ३,६७९.६६ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे.

भारताबरोबरच कंपनीची चीनमधून होणारी वाहनमागणीही यंदा रोडावली आहे. कमी मागणीमुळे टाटा मोटर्सनेही गेल्या तिमाहीत काही दिवस उत्पादन बंद ठेवले होते. नॅनोसारख्या कारची विक्री व उत्पादनही गेल्या काही महिन्यांपासून ठप्पच आहे.

वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीदरम्यान टाटा मोटर्सला १,८६२.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मंदीसदृश वाहन उद्योग क्षेत्रात वाढता विपणन खर्च व घसघशीत सूट-सवलतींचाही फटका टाटा मोटर्सला यंदा बसला आहे.

प्रवासी तसेच व्यापारी वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या टाटा मोटर्सने एप्रिल ते जून २०१९ दरम्यान एकूण ६१,४६६.९९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६६,७०१.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत तो कमी झाला आहे.

कंपनीची ब्रिटिश नाममुद्रा असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हरने गेल्या तिमाहीत ३९.५० कोटी पौंड तोटा नोंदविला आहे. उपकंपनीची जागतिक वाहन विक्री चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ११.६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

कंपनीला भारताबरोबरच चीनमधूनही कमी मागणी राहिल्याने वाहन विक्री कमी झाल्याचे टाटा मोटर्सचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी पी. बी. बालाजी यांनी वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना स्पष्ट केले. त्याचबरोबर अन्य काही कारणेही असल्याचे नमूद करण्यात आले.

खरेदीदारांकडून कमी मागणी, रोकड चणचण तसेच चढा करभार आणि विम्याचे शुल्क याचाही विपरीत परिणाम वाहन उद्योगावर झाल्याचे टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक गुंटर बटशेक यांनी म्हटले आहे.